संत एकनाथांची सर्वसमावेशकता

सादिक खाटीक

<< अध्यक्ष मुस्लीम खाटीक समाज महाराष्ट्र >>

आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथे नाथषष्टी आत्मियतेने साजरी केली जाते. गोमेवाडी येथील देशपांडे, इनामदार, कुलकर्णी बांधवांनी अलुतेदार-बलुतेदार व इतर बहुजनांसमवेत एकनाथ षष्टीचा उत्सव साजरा करण्यास सुरुवात करून एक शतक आणि १९ वर्षे झाली. ८ मार्च १९९९ला एकनाथ महाराजांच्या महानिर्वाणास आता चार शतकांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत संतांच्या कार्याचा वाटा मोठा आहे. इहलोकीचे दुःख विसरून चंद्रभागेच्या वाळवंटात अध्यात्मीक व पारमार्थीक ऐक्याची लयलूट करण्यात संत यशस्वी झाले. याची सुरुवात ज्ञानदेवांच्या रूपाने झाली. भागवत धर्माची ही पताका सामाजिक स्तराच्या अंतरंगापर्यंत नेऊन रुजविण्याचे व स्थिरावण्याचे महान कार्य संत एकनाथ महाराजांनी केले. तेही वेगळय़ा पद्धतीने. नाथकालीन महाराष्ट्राकडे नजर टाकल्यास असे आढळून येते की, सर्वच स्तरावर दांभिकता वाढली होती. मानवता धर्माचा विसर पडून कर्मकांडांनाच महत्त्व प्राप्त झालेले होते. भोंदूगिरीचा सुळसुळाट झालेला होता. विविध आक्रमणांनी महाराष्ट्राची संस्कृती व मराठी भाषेची अस्मिता याची गळचेपी होऊ लागली होती. अत्याचाराने परमोच्च बिंदू गाठलेला होता. या मरगळीलाच नाथांनी आपले साहित्य स्रोत बनविले व साहित्य निर्मितीला सुरुवात केली.

इ.स. १५३३मध्ये पैठण येथे जन्मलेल्या एकनाथांची साहित्य संपदा विपूल आहे. उपेक्षित राहिलेल्या प्रतिमांचा, रुपकांचा सढळ हाताने त्यांनी साहित्यात वापर केला. एका अर्थी साहित्यिक अस्पृश्यतेचे हे उच्चाटन होते. पंडित आणि विद्वानांसाठी चतुःश्लोकी भागवत आणि एकनाथी भागवताचे लेखन केले. मध्यमवर्गीयांसाठी रुक्मिणी स्वयंवर आणि भावार्थ रामायण हे ग्रंथ रचले. समाजातील सर्वसामान्य लोकांसाठी भारुडांची निर्मिती केली.

ओवी ज्ञानरायाची, अभंग तुकारामांचे तसे भारुड एकनाथांचे. लोकांशी सुसंवाद करायचा असेल तर त्यांच्या अंतर्मनात शिरले पाहिजे. लोकमानसाचा मार्ग लोकभाषेतून जात असतो हे नाथांनी अचूक हेरले होते. म्हणूनच बहुजन समाजाचे भावविश्व त्यांच्या संवेदनशील मनाने अत्यंत जवळून पाहिले. लोकांचे खेळ, उत्सव, सण त्यांच्या सहवासात येणाऱ्या व्यक्ती प्राणी, पक्षी या सर्वांचे संदर्भ ध्यानात घेऊन त्यांनी भारुडांची निर्मिती केली. एकनाथांनी भारुडाचा उपयोग समाज प्रबोधनासाठी केला. हे करीत असताना संसारातील नित्याचे अनुभव विचारात घेतले. अशिक्षितपणा, अडाणीपणा, अंधश्रद्धा, लोकसंख्या वाढ, दारिद्रय़, बेकारी, स्त्र्ायांवरील अत्याचार, अन्याय, कर्मकांड, देवभोळेपणा, आळशी प्रवृत्ती, खोटे बोलणे लबाडी, याविरुद्ध नाथांनी आपली वाणी व लेखणी वापरली, चालविली. नाथांची ही परिस्पर्शी किमया खरोखरच त्यांच्या कवित्वाची, अजोड प्रतिभाशक्तीची साक्ष देणारी आहे.

एकनाथ महाराज ज्या समाज जीवनात वावरत होते त्या समाज जीवनाचा कोपरान्कोपरा त्यांनी न्याहाळला. अनेक व्यक्तींचा, जाती-जमातींचा त्यांनी अभ्यास केला. समाजात ज्यांना फार नगण्य स्थान दिले जात होते. अशांचा आपल्या भारुडात विशेष करून नायकाच्या स्थानी नाथांनी समावेश केला. हे करण्यामागे सर्वसमावेशकता व लोकांच्या अंतर्मनाचा ठाव घेणे असाच उद्देश असला पाहिजे. कारण या मंडळीचा वावर मराठी संत काव्यात यापूर्वी फारसा झालेला दिसत नाही.

हे विश्वची माझे गुरू अशी नाथांची धारणा होती. ज्या वस्तूकडून अथवा व्यक्तीकडून त्यांनी जो गुण घेतला त्याला त्यांनी आपले गुरू मानले. त्याचबरोबर ज्यांच्यातील दोष पाहून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातील ते दोष टाळले, घालवले अशांनाही त्यांनी गुरू मानले. पृथ्वी, वायू, आकाश, अग्नी, जल, चंद्र, सूर्य, कपोतपक्षी, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, भ्रमर, हरीण, मासा, पिंगळा नावाची वेश्या, टिटवी, मूल, कुमारी, बाण करणारा लोहार, सर्प, कांतनी, कुंभारीन अशा चोवीस गुरूंनी नाथांना संपन्न बनविले. ऐहीक जीवन सुखी व समृद्ध करण्याचा एक‘नाथ’मंत्र आहे. वैराग्यपूर्ण आत्मज्ञान व वासना त्याग, ध्येयासक्त होऊन केलेले नित्यकर्म हे नाथामृत होते. त्याला भाषिक मर्यादा नव्हत्या. समानतेचा, एकतेचा, संदेश त्यांच्या हिंदी रचनेतही आढळतो. नामसंकीर्तन, नामभक्ती, नामस्मरण म्हणजे भागवत धर्माचे बीज होय. नामस्मरण अंर्तशुद्धीचे व सुखाचे एकमेव साधन नाथांनी मानले. मोक्षप्राप्तीचा सर्वात सुलभ मार्ग म्हणजे संतसेवा करणे हा विचार त्यांनीच मांडला. नाथांची भूमिका सर्वसमावेशक व लोककल्याणाची होती. तिचेच प्रतिबिंब त्यांच्या अभंगातून उमटले.