कोकण किनारपट्टी आज पासुन ३६ तास ‘सील’

सामना ऑनलाईन, मालवण

सागरी सुरक्षेची परीक्षा घेणारी मोहीम म्हणून ओळखली जाणारी ‘सागर सुरक्षाकवच’ मोहीम ८ व ९ नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. या मोहीमेंतर्गत समुद्र आणि किनारपट्टीवर तब्बल ३६ तास कडेकोट पोलीस बंदोबस्त सुरु राहणार आहे.

मालवण-आचरा किनारपट्टीवर ६४ पोलीस कर्मचारी व ५ अधिकारी तैनात असणार आहेत. तोंडावळी व आचरा येथे दोन वॉच टॉवर आणि दोन स्पीड बोटींद्वारे नाकाबंदी व पोलिसांची गस्त राहणार आहे. अशाच प्रकारची गस्त कोकणातील प्रत्येक किनारपट्टी भागात होणार आहे.

ठाणे येथून प्रशिक्षित पोलीस कर्मचारी असलेली ‘रेड’ टीम त्या-त्या किनारपट्टीवरील पोलिसी सुरक्षा भेदण्यासाठी सागरी रस्त्यांवरून प्रवास करणार आहे. या सुरक्षा मोहिमेत हलगर्जीपणा दाखविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही तरतूद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील सर्व पोलीस ठाण्याच्यावतीने मोहिमेविषयी गांभीर्य बाळगण्यात येत असते. मालवण तालुक्यात किनारपट्टीवरील सर्व गावांत प्रवेश करणाऱ्या नाक्यानाक्यावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. दोन ठिकाणी टॉवरही उभारण्यात येणार आहेत. किनारपट्टीच्या सुरक्षिततेबाबत सागर सुरक्षा रक्षक दलाच्या सदस्यांनाही खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

दि. ८ रोजी सकाळी सहा वाजता सुरू होणारी ही मोहीम दि. ९ रोजी सायंकाळी सहा वाजता संपणार आहे. तब्बल ३६ तासांच्या या मोहिमेच्या कालावधीत कोणत्याही मार्गाने रेड टीम आपले ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील सर्व पोलीस ठाण्यांना कडक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात आला आहे. मालवण पोलीस ठाण्यासाठी जादा पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

काही वर्षांपूर्वी सागर सुरक्षा कवच मोहिमेत देवगड पोलीस ठाण्यातच रेड टीमने प्रवेश करून आपले काम फत्ते केले होते. यावेळी रेड टीम यशस्वी होते की पोलिसांची ब्ल्यू टीम यशस्वी होते, हे आगामी ३६ तासातच समजून येणार आहे.

रेड आणि ब्ल्यू टीम म्हणजे काय?
दरवर्षी नौदल, कोस्टगार्ड, पोलीस यांच्यातर्फे सागर सुरक्षा कवच मोहीम आयोजित करण्यात येते. रेड आणि ब्ल्यू अशा दोन टीममध्ये ही मोहीम चालते. सुरक्षा यंत्रणेतीलच सर्व कर्मचारी या दोन्ही टीममध्ये कार्यरत असतात. रेड टीम सुरक्षा कवच भेदणारी आणि ब्ल्यू टीम सुरक्षा कवच मजबूत ठेवणारी असणार आहे. जर रेड टीम आपल्या मोहिमेत यशस्वी ठरल्यास ब्ल्यू टीमच्या लिडर आणि अन्य कर्मचाऱ्यांवर कारवाईची भीती असते. यात अधिकाऱ्यांना कारणे दाखवाही नोटीस वरिष्ठ कार्यालयाकडून येत असते. या कार्यवाहीचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांकडेही पाठविण्यात येत असतो. या मोहिमेत जिल्हा पोलीस अधीक्षकही सहभागी होत असतात. त्यामुळे या मोहिमेला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे.