मोदींना सहारा समूहाने ६ महिन्यात ४० कोटी रुपये दिले, राहुल गांधी यांच्या आरोपामुळे खळबळ

सामना ऑनलाईन । मेहसाणा

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी मेहसाणा येथील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे वैयक्तिक आरोप करून खळबळ उडवून दिली. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असताना मोदी यांना सहारा समूहाकडून सहा महिन्यात ४० कोटी रुपये दिले आहेत. आयकर विभागाने सहारा समूहावर २०१४ मध्ये टाकलेल्या धाडीत आढळलेलल्या गोपनीय कागदपत्रांतून हा खुलासा झाल्याचा गौप्यस्फोट राहुल यांनी केला. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नोटाबंदीची मोहिम गरीबांविरोधी असल्याची टीका करताना मोदी हे भ्रष्टाचारात गुंतले असल्याचे आपल्याकडे पुरावे असल्याचे राहुल गांधी यांनी नुकतेच सांगितले होते. त्यानंतर त्यांनी बुधवारी येथे थेट मोदींवर आरोप केले.

मेहसाणा येथे बोलताना राहुल म्हणाले, जर मोदी सरकारने भ्रष्ट्राचार निर्मूलनासाठी कोणतेही छोटे अथवा मोठे पाऊल टाकले त त्याला काँग्रेस पक्ष पाठींबा देईल. मात्र नोटाबंदी ही काळा पैसा अथवा भ्रष्ट्राचार विरोधातील नव्हे तर इमानदार लोकांविरोधातील मोहिम आहे. सर्व रोकड पैसा काळा पैसा असू शकत नाही आणि सर्व काळा पैसा केवळ नोटांच्या स्वरुपातच असत नाही, असे राहुल म्हणाले.

मोदी सरकार गरीब आणि दलितविरोधी असल्याचे सांगून राहुल पुढे म्हणाले, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि झारखंड राज्यातील भाजप सरकारने आदिवासींची जमीन हडप केली आहे. देशात दलितांची छळणूक करुन करुन त्यांना ठार मारले जात आहे. तर गुजरातमधील दलीत भयग्रस्त असल्याचा दावा त्यांनी केला.

गुजरातमधील पाटीदार पटेल समाजाने आंदोलन करताना हिंसाचार केला नाही. मात्र त्यांच्या महिला आणि बालकांना मारहाण करण्यात आल्याचे राहुल यांनी भाषणात सांगितले. स्विर्त्झलंडमधील सरकारने काळा पैसावाल्यांची नावे हिंदुस्थान सरकारला दिलेली आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना संरक्षण देत आहेत. संसदेत काळा पैशेवालांची नावे ते (मोदी ) का जाहिर करीत नाहीत, असा सवाल राहुल यांनी यावेळी केला.