रत्नाकर मतकरी, नवनाथ गोरे यांना साहित्य अकादमी


सामना ऑनलाईन, मुंबई

साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे समजले जाणारे साहित्य अकादमीचे बाल आणि युवा पुरस्कार आज जाहीर झाले असून ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी आणि नवनाथ गोरे यांनी पुरस्कारावर  आपले नाव कोरले आहे. बाल साहित्यातील समग्र योगदानाबद्दल  रत्नाकर मतकरी यांना तर  नवनाथ गोरे यांच्या ‘फेसाटी’ कादंबरीला पुरस्कार जाहीर झाला आहे.

साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली गुवाहाटी येथील बैठकीत २३ भाषांतील बाल साहित्य तर २२ भाषांतील युवा साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ५० हजार रुपये आणि ताम्रपट असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.   बालनाटय़ चळवळीचे अध्वर्यु रत्नाकर मतकरी यांनी अलबत्या गलबत्या, निम्माशिम्मा राक्षस, राक्षसराज झिंदाबाद, यक्षनंदन अशा अनेक पुस्तकांचे आणि बालनाटय़ाचे लेखन केले आहे. नवनाथ गोरे यांनी ‘फेसाटी’ कादंबरीतून खेडय़ापाडय़ातील, दुष्काळी भागाचे आणि शेतकरीवर्गाचे जीवन मांडले आहे. गोरे हे  मूळचे सांगली जिह्यातील उमदी येथील आहेत.