‘असेही एक साहित्य संमेलन’

सामना प्रतिनिधी । मुंबई

नाट्यवर्तुळात मुळ्ये काका म्हणून प्रसिद्ध असणारे रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून दादर- माटुंगा सांस्कृतिक केंद्र माटुंगा, येथे येत्या २५ डिसेंबर रोजी अनोखे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ‘असेही एक साहित्य संमेलन’ असे संमेलनाचे नाव आहे. अरुण शेवते हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आहेत.

संमेलने तर अनेक होतात, पण कोणत्याही वादाशिवाय आणि कुणाच्याही मदतीसाठी एकहाती होणारे संमेलन म्हणजे ‘असेही एक साहित्य संमेलन’ होय. असेही एक साहित्य संमेलन म्हणजे छोटय़ा- मोठय़ा पडद्यावरील कलाकार, लेखक, व्यंगचित्रकार, स्तंभलेखक आदींचे हे स्नेहसंमेलनच जणू. कार्यक्रमाची संकल्पना आणि आयोजन अशोक मुळ्ये यांचे आहे. त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाची लेखी निमंत्रण पत्रिका नसते. मुळ्ये काकांनी फोनवरून दिलेले निमंत्रण आणि वैयक्तिक संपर्क यांच्या जोरावर मान्यवर कार्यक्रमात सहभागी होतात. ते स्वत: ११ हजार रुपयांचा निधी देतात. स्वागताध्यक्षपदी रविप्रकाश कुलकर्णी आहेत. दुपारी २ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहणारे हे संमेलन फक्त निमंत्रितांसाठीच आहे, अशी माहिती मुळ्ये यांनी दिली. एका सच्चा रसिकाने संमेलनाचा अध्यक्ष म्हणून माझी निवड करणे ही खूप आनंदाची गोष्ट आहे. वाड्मयीन दृष्टी, दिवाळी अंक परंपरा, लेखन यावर संमेलनात बोलणार आहे, अशी माहिती अरुण शेवते यांनी दिली.

यंदाच्या संमेलनात गेली २५ वर्षे दर्जेदार दिवाळी अंकांची परंपरा सांभाळणारे ‘ऋतुरंग’चे संपादक अरुण शेवते आणि दुर्धर आजाराचा सामना करीत ‘कॅलिडोस्कोप’ पुस्तक लिहिणारी सृष्टी कुलकर्णी आणि विक्रमी खपाच्या दिवाळी अंकाची निर्मिती करणारा झी समूह यांना ‘माझा पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येणार आहे.

‘अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील न्यूड चर्चा’ या परिसंवादात शरद पोंक्षे, संजय पवार आदी मंडळी सहभागी होतील. रात्री प्रशांत लळित यांचे संगीत संयोजन असलेला गाण्यांचा कार्यक्रम सादर होईल. यामध्ये बकुळ पंडीत, नीलिमा गोखले, सागर सावरकर यांच्या गायनाचा आनंद रसिकांना घेता येईल.