गंगागिरी हरीनाम सप्ताहास साईबाबा संस्थानचे अर्थसहाय्य

सामना प्रतिनिधी । शिर्डी

साईनगरीतील गंगागिरी हरीनाम सप्ताहास साईबाबा संस्थान पंच्याहत्तर लाख रूपयांचे अर्थसहाय्य देणार आहे. व्यवस्थापनाच्या या निर्णयाला सरकारने परवानगी दिल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांनी दिली़.

सुमारे पावणे दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या गंगागिरी हरीनाम सप्ताहाचे यंदा साईनगरीत आयोजन करण्यात आले आहे. १८७५ च्या सुमारास गंगागिरी महाराजांनी समाजाला साईबाबांच्या देवत्वाची ओळख करून दिली होती. त्यामुळे या दोन संताच्या स्मृतींनाही उजाळा देण्याचा या सप्ताहाद्वारे प्रयत्न करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर साईसंस्थान व्यवस्थापनाने या सप्ताहाच्या आयोजनासाठी पंच्याहत्तर लाख रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्य सरकारकडे परवानगीसाठी पाठवण्यात आला होता़. या अर्थसहाय्याला परवानगी मिळण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत होता. सोमवारी सायंकाळी या देणगीला मुख्यमंत्र्याच्या अखत्यारीतील विधी व न्याय खात्याने मान्यता दिल्याचा अध्यादेश काढला आहे.