सायना, प्रणॉय नवे राष्ट्रीय चॅम्पियन

सामना प्रतिनिधी। नागपूर

जागतिक रँकिंगमध्ये ११ व्या स्थानावर असलेल्या सायना नेहवाल व एच. एस. प्रणॉय या दोन खेळाडूंनी बुधवारी बॅडमिंटन कोर्टवर शानदार खेळ करीत राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. सायना नेहवालने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावणाऱया पी. व्ही. सिंधूला तर एच. एस. प्रणॉयने जागतिक क्रमवारीत दुसऱया स्थानावर असलेल्या किदाम्बि श्रीकांतला हरवत जेतेपदावर अगदी रुबाबात मोहोर उमटवली.

सायना नेहवालने अव्वल सीडेड व जागतिक क्रमवारीत दुसऱया स्थानावर असलेल्या पी व्ही सिंधूला २१-१७, २७-२५ अशा फरकाने हरवले. एच. एस. प्रणॉयने किदाम्बि श्रीकांतला २१-१५, १६-२१, २१-७ असे पराभूत केले. दरम्यान, अश्विनी पोनप्पा व सात्विक साईने मिश्र दुहेरीचे आणि अश्विनी पोनप्पा व सिक्की रेड्डीने महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले.