तुकोबारायांचा समृद्ध वारसा

अनुराधा राजाध्यक्ष, [email protected]

डॉ. सदानंद मोरे… संत तुकारामांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक… रक्तातच संत साहित्याचा संस्कार असल्याने अफाट साहित्यसंपदा त्यांच्या लेखणीतून निपजली आहे.

घरातल्या माणसांवरच घराचं घरपण अवलंबून असतं हे मानणारे आणि ते घरपण अनुभवत, अभ्यास, सांगोपांग चर्चा आणि विविध विषयांचं विश्लेषण या संस्कारांच्या शिदोरीला आपल्या लेखणीतून व्यक्त करणारे तुकाराम महाराजांचे दहावे वंशज डॉ. सदानंद मोरे यांच्याशी खास आषाढीनिमित्त बोलण्याचा योग आला… परंपरांना आणि रीतीरिवाजांना आंधळेपणानं अंमलात न आणता, त्यांचा उद्देश आणि अर्थ समजून घेतला पाहिजे, त्याची सांगड आपल्या जीवनशैलीशी घालता आली पाहिजे, याच मताचे ते आहेत. साहित्य अकादमीसह अनेक पुरस्कार लाभलेलं त्यांचं ‘तुकाराम दर्शन’ हे पुस्तक तुकारामांच्या अभंगांचं, कालानुरूप असणारं अधिष्ठानच दाखवतं आणि परंपरांच्या जोखडातून जगण्याला मुक्त करत जीवनाकडे बघण्याचा नवा आयाम देतं.

डॉ. सदानंद मोरे त्यांचा जीवनप्रवास आणि लेखन प्रवास सांगताना म्हणाले, माझं घर मुळात देहूचं. देहू वारकरी संप्रदायाचं केंद्र. आमचं पारंपरिक, वारकरी घराणं. वडील वारकरी होते तसेच विविध विषयांचे अभ्यासकही होते. कुठल्याही संप्रदायात ज्या अंतर्गत परंपरा असतात, फड असतात त्याचीही त्यांना माहिती होती. तुकाराम महाराजांच्या घराचा आमच्या वाटय़ाला जो हिस्सा आला होता, तिथेच माझ्या पणजोबांनी घर बांधलं होतं. आमच्या घराला समोरची भिंत अशी नव्हतीच. तिथे होती एक मोठी लाकडी चौकट. त्या चौकटीमध्ये तीन दरवाजे होते. ते उघडले की लगेच ओसरी… आणि दरवाज्याच्या बाहेर तुकाराम महाराजांचं मंदिर. तिथे भजन कीर्तन चालू असायचं. लोकांची ये-जा असायची. आमचं घर दुमजली. पहिल्या मजल्यावर फक्त खिडक्या. ओसरीवर वडिलांना भेटायला अनेक विद्वान यायचे. त्यांच्या चर्चा व्हायच्या वेगवेगळ्या विषयांवर. ओसरीपासून घरातल्या प्रत्येक खोलीत लक्षात राहणारी एकच ठळक गोष्ट होती ती म्हणजे पुस्तकं…

आइन्स्टाईनपासून कार्ल मार्क्सपर्यंत विविध विषयांवरची… आत्ताही माझं घर पुस्तकं आणि पुरस्कारांनी भरलेलं आहे. माझी आई शिक्षिका होती, रयत शिक्षण संस्थेमध्ये. मी तिचा विद्यार्थी. तिचं भाषांवर प्रभुत्व. मराठी, संस्कृत, हिंदी, इंग्रजी. तिच्या संस्कृत अभ्यासाचा मलादेखील खूप फायदा झाला. वडील डिफेन्समध्ये नोकरीला होते. झालं असं की १९४२ च्या स्वातंत्र्य लढय़ात त्यांनी भाग घेतला होता. शिक्षण थांबलं होतं. त्यानंतर ते संपर्कात आले विष्णुपंत चितळेंच्या. त्यांच्याकडे दोन गट होते. एक होता बॉम्ब तयार करून योग्य वेळी योग्य ठिकाणी त्याचा स्फोट घडवून आणणारा आणि दुसरा गट होता बॉम्ब बनवण्याचं साहित्य पुरवणारा. वडील दुसऱया गटात होते. ते देहूच्या इंग्रजांच्या दारूगोळ्याच्या डेपोत काम करत होते. नोकरी करत असताना, तिथल्या अधिकाऱयांच्या नकळत तिथलाच कच्चा माल ते क्रांतिकारकांना पुरवायचे. अत्यंत धोकादायक असं काम होतं ते. पण तो काळच असा होता की, स्वातंत्र्य लढय़ापासून कोणीच दूर राहू शकत नव्हतं.

सदानंद मोरे त्यांच्या घरातल्या धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वातावरणाचा त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वावर आणि पर्यायानं लिखाणावर झालेला संस्कार सांगत होते. डॉक्टरांच्या बोलण्यातून एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की त्यांचं बालपण तथाकथित जुन्या जमान्यातलं असलं तरी वडील म्हणजे संवाद क्षेत्रापलीकडला असा एक माणूस, ज्याचा घरात फक्त धाकच असतो, अशी दुराव्याची दरी त्यांच्या घरात नव्हती. हेच अधोरेखित करताना डॉक्टरसुद्धा म्हणाले, ‘मी बसायचो तिथेच, त्या ओसरीवर, वडिलांच्या आणि थोरामोठय़ांच्या चर्चा ऐकत, त्या ऐकता ऐकता मी कधी त्याचा हिस्सा बनलो, तेसुद्धा मला कळलं नाही.‘तू लहान आहेस, तुला काय कळतं? अशी वाक्यं आजही वडीलधाऱयांकडून सर्रास ऐकू येतात, पण डॉक्टरांच्या घरी तसं घडलं नाही. त्यामुळेच त्यांच्या विचारप्रक्रियेला चालना मिळाली. ‘कधी कुणाला एखाद्या अभंगाचा चरण आठवत नसेल किंवा एखाद्या पुस्तकाचा संदर्भ हवा असेल तर माझी स्मरणशक्ती आणि पाठांतर तिथे कामी यायचं.’ डॉक्टर सांगत होते.

सदानंद मोरे म्हणाले, ‘माझं आणि माझ्या वडिलांचं नातं, भावनिक असण्यापेक्षा इंटेलेक्चुअल होतं.’ आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगाला बुद्धीच्या कसोटीवर पारखून घेण्याचा हा संस्कार डॉक्टरांच्या लिखाणातही उतरला. आपल्या धार्मिक आणि सांप्रदायिक अभ्यासाला एक व्यापक बैठक हवी म्हणून तत्त्वज्ञानाची आपण डिग्री घ्यायची हे त्यांनी लहानपणीच ठरवलं होतं. त्यासाठी त्यांच्यासमोर आदर्श होता तो सोनोपंत दांडेकरांचा… कीर्तन प्रवचन करत असतानाच नियतकालिकांतून सातत्यानं ते लिखाण करत होते. भगवद्गीतेवर संशोधन करून त्यांनी नंतर पीएचडीसुद्धा मिळवली. नगर महाविद्यालयात आणि नंतर पुणे विद्यापीठात अध्यापन केलं. डॉक्टर म्हणाले, सदा डुंबरेंनी तुकोबांविषयी जे सदर लिहायला सांगितलं त्यातून ‘तुकाराम दर्शन’ पुस्तक आकाराला आलं. तुकारामांच्या अभंगांचं निरूपण करणं एवढाच त्या लेखमालेचा उद्देश नव्हता, तर सांप्रदायिक आणि आधुनिक पद्धतीनं विचार करणारा तुकोबा मला लोकांसमोर आणायचा होता. त्यांच्या अभंगांचा वर्तमानाशी असणारा संबंध मला दाखवायचा होता, कारण असं एकही क्षेत्र नाही की ज्यावर तुकोबांचा प्रभाव पडलेला नाही. तुकोबांना टाळून आणि डावलून पुढे जाताच येत नाही. इतके ते अपरिहार्य आहेत असं मला वाटतं. तुकोबांच्या अभंगातून अनेकांना स्फूर्ती मिळाली आहे. न्यायमूर्ती रानडे तर न्यायनिवाडा करताना अडले की तुकोबांचे अभंग म्हणत. प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज यांच्यामुळे तुकोबांचे विचार बंगाल गुजरात प्रांतापर्यंत पोहोचले.’

‘दया तिचे नाव भूतांचे पाळण आणिक निर्दळण कंटकांचे’ ही तुकोबांनी केलेली अहिंसेची पूर्ण व्याख्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अधिक रुचली होती. बाबुराव बागुल यांनी तुकारामांच्या अभंगांची ताकद सांगताना लिहिलं, ‘अरे ती माझी बंदूक तरी द्या, नाहीतर तुक्याची वीणा तरी द्या. गावोगावी जाईन म्हणतो. या वीणेवर क्रांतीची गीते गाईन म्हणतो.’ मानवी जीवनात क्षमा आणि नम्रता यांचं महत्त्व प्रतिपादन करणारा कवी क्रांतीची प्रेरणा देऊ शकतो याचं कारणच मुळी त्याला मानवी जीवनाच्या व्यापकतेचं, व्यामिश्रतेचं आणि समाजाचं भान होतं, असं डॉक्टरांनीच एका लेखात म्हटलं आहे.

तुकोबांनी जे वेगवेगळे अनुभव घेतले ते त्यांच्या अभंगातून आले. मराठीत अनेकदा आपण म्हणतो, ‘आलिया भोगासी असावे सादर’, ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’ ही सगळी तुकोबांच्याच लेखणीची किमया आहे. ‘नित्य हरिकथा नित्य नामावळी, वैष्णवांच्या कुळी धन्य जन्म’ संत नामदेव महाराजांनी वैष्णवांच्या घराचं हे जे वर्णन केलं आहे, तशाच घरात जन्मलेले डॉ. सदानंद मोरे मला हे आवर्जून सांगत होते की तुकाराम, नामदेवांच्या काळात जशा पद्धतीनं संप्रदायातल्या लोकांची जीवनपद्धती होती, तशी ती आता मी अवलंबणं शक्यच नाही. नैमित्तिक कर्म धर्म माझ्याकडून पाळले जात नाहीत, पण माझ्या अभ्यासाच्या आणि लेखणीच्या माध्यमातून ती कसर मी भरून काढली आहे. काळानुसार विचारधाराही बदलली पाहिजे आणि परंपरेचं अंधानुकरण केलं जाऊ नये यासाठीचं हे प्रत्यक्ष उदाहरणच म्हणावं लागेल.