‘परश्या’ची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; ‘या’ दिग्दर्शकासोबत करणार काम!

सामना ऑनलाईन । मुंबई

‘सैराट’ सिनेमामुळे रातोरात स्टार झालेल्या परश्या म्हणजेच आकाश ठोसर बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटातून आकाश बॉलिवूडमध्ये येण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटात आकाश राधिका आपटेसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या सिनेमात आकाशला पाहण्यासाठी त्याचे फॅन आतूर झाले आहे.

सैराट सिनेमानंतर आकाश महेश मांजरेकरांच्या ‘एफयू’ सिनेमात झळकला होता. ‘एफयू’नंतर आकाश आता हिंदी सिनेमात काम करणार असल्याची माहिती खुद्द अनुराग कश्यपने दिली आहे. सिनेमात राधिका आणि आकाश एकमेकांचे चांगले मित्र आहेत. गेल्या आठवड्यात सलग चार दिवस मुंबईत या चित्रपटातल्या काही दृश्यांचं चित्रीकरणही झालं असल्याची माहिती अनुराग कश्यपनं दिली आहे. आकाश ठोसरच्या या नव्या चित्रपटाचे नाव काय असेल आणि तो कधी रिलीज होईल याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.