साक्रीवासीयांचे आरोग्य बिघडले!

सामना ऑनलाईन । साक्री

दिवसेंदिवस बदलणाऱ्या तापमानामुळे साक्री तालुक्यातील लोक चिकनगुनिया, ताप, सर्दी, खोकला यासारख्या आजारांनी त्रस्त झाले आहेत. त्यात काही दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी डबक्यांमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी डेंग्यू, मलेरिया, हिवताप, टायफॉईड यांसारख्या आजारांचे प्रमाणही वाढले आहेत.

बळसाणे गावाची लोकसंख्या पाहता बळसाणे उपकेंद्रात आरोग्य सेवकांची संख्या प्रचंड कमी आहे. त्यामुळे त्या जागा भरण्याची मागणी शिवसेनेचे उपविभाग प्रमुख महावीर जैन यांनी केली. शिवसेनेच्या दणक्याने साक्री तालुक्यातील आरोग्य अधिकारी डॉ. अनुराधा लोया यांनी नुकतीच बळसाणे गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला भेट देऊन संपूर्ण केंद्राची पाहणी करताना इथला भोंगळ कारभार लक्षात आल्याने सर्व अधिकाऱ्यांना, कोणत्याही प्रकारची कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता करावी, अशी सूचना केली.

आरोग्य अधिकाऱ्यांनी बळसाणे येथे येऊन रुग्णांची घरोघरी तपासणी केली असता त्यांना रुग्णांमध्ये ताप, थंडी, हात-पाय दुखणे यासारखी साथीच्या आजाराची लक्षणे आढळली. त्यानंतर आरोग्य विभागाने योग्य उपचार केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तसेच नुकताच १३ जणांच्या आरोग्य विभागाच्या टीमने बळसाणे गावात येऊन लोकनियुक्त सरपंच छोटू गिरासे व महावीर जैन यांच्यासोबत सर्व्हे करून गावकऱ्यांना स्वच्छतेचा सल्ला दिला.

ताप, सर्दी-खोकल्यासह मलेरियाचे रुग्ण वाढले

मलेरियाची २३, गॅस्ट्रोची ३ तर डेंग्यूचा एक रुग्ण आहे. तसेच हिवताप, टायफॉईडचेही रुग्ण असल्याचे तालुक्याच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.