पैशांसाठी फिल्मवाले नग्नही होतील ! साक्षी महाराज

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

पद्मावती चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करून प्रेक्षकांसमोर नको ते चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला जात असल्याबद्दल आत्तापर्यंत अनेकांनी आक्षेप घेतला आहे. भाजप खासदार साक्षी महाराज यांनीही या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. पद्मावती राणी, हिंदू धर्माचा या चित्रपटातून अपमान होत असल्याचं म्हणत साक्षी महाराज यांनी या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी केली आहे. फिल्मी लोकांना देशाच्या अस्मितेबद्दल काहीही वाटत नसून हे लोकं पैशांसाठी नागडेही होतील अशा शब्दात साक्षी महाराज यांनी टीका केली आहे.

यापूर्वी भाजपचेच खासदार चिंतामणी मालवीय यांनीही या चित्रपटावर आक्षेप नोंदवताना वादग्रस्त विधान केलं होतं. ज्या चित्रपटसृष्टीमध्ये महिला रोज शौहर म्हणजेच नवरे बदलतात त्यांना जौहर म्हणजेच महिला शत्रूकडून अत्याचार सहन करण्यापेक्षा स्वत:ला अग्निकुंडात झोकून देणं कळणार नाही असं त्यांनी विधान केलं होतं. १ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याला होणारा विरोध दिवसेंदिवस वाढत चालला आहे.