सलाम… लेफ्टनंट स्वाती

मेधा पालकर, [email protected]

जिद्द आणि कठोर मेहनत या दोन्ही गोष्टींसोबत कोणतीही गोष्ट अशक्य नसते. लेफ्टनंट स्वाती महाडिकने ते सिद्ध केलंय…

जम्मू-कश्मीरमध्ये कुपकाडा जिल्हय़ातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हाजी नाका परिसरात दाट जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव साताऱयातील मूळ गावी अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. त्यावेळीच त्यांची पत्नी स्वाती यांनी लष्करात जाण्याचा निर्धार व्यक्त केला होता. आज त्या ११ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रत्यक्ष लष्करात दाखल झाल्या आहेत.

लष्कर व संरक्षणमंत्र्यांनी वयाची अट शिथील केल्यानंतर स्वाती यांनी स्टाफ सिलेक्शन बोर्डाची (एसएसबी) परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. पाच वर्षांचा मुलगा आणि अकरा वर्षांच्या मुलीला घरी ठेवून त्यांनी पुणे गाठले. काही महिने कसून तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात त्या या परीक्षेत उत्तीर्णही झाल्या. वैद्यकीय आणि शारीरिक चाचणीही पार केल्याने स्वाती यांची चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकडमीसाठी (ओटीए) निवड झाली. त्यानंतर मुलगा स्वराज याला पाचगणीत आणि मुलगी कार्तिकी हिला डेहराडून येथील बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवून स्वाती प्रशिक्षणासाठी रवाना झाल्या. प्रशिक्षण संपवून कुटुंबीयांसोबत सुट्टी घालवल्यानंतर स्वाती या आर्मी ऑर्डनन्स कोअरमध्ये दाखल झाल्या आहेत.

स्वाती या कुटूंबात रमणाऱया. त्या सांगतात, मी काही करीअर ओरिएंटेड मुलगी नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेत नोकरी करत असतानाच मी वडिलांच्या मागे लागले. माझे लग्न करा. वडीलही माझ्यासाठी मुलगे पाहू लागले. मला संसार करण्यात खूप रुची. त्यातच संतोषचे स्थळ आले. खूप चांगला पती मला मिळाला. आम्ही साडेबारा वर्षे सुखाचा संसार केला. स्वप्नातसुध्दा वाटले नव्हते की, संतोषचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्याची वेळ माझ्यावर येईल, पण पर्याय नव्हता. मी नेहमी म्हणायचे, संतोषची पहिली पत्नी त्यांची इंडियन आर्मी आहे. त्यानंतर मी त्याची दुसरी पत्नी. इतकं त्याचं आर्मीवरचं प्रेम दृढ होतं.

संतोषचे आर्मीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सेवेत दाखल होण्याचा निर्धार केला. माझ्यासाठी हे खूप मोठे आव्हान होते.  खडतर प्रशिक्षण पूर्ण केलं, असं म्हटलं जात असलं तरी मी खडतर असं प्रशिक्षण घेतलं नाही. मला प्रशिक्षणाच्या ठिकाणी सर्वांनी मोलाची साथ दिली. पटकन तयार होणं, सायकल चालवणं, चटकन ती स्टॅण्डला लावून धावत जाणं या क्रिया खूपच वेगात कराव्या लागतात. अशावेळी माझे सहकारी मला जर सायकलचे स्टॅण्ड लावताना वेळ लागला तर ते लावून द्यायचे, मी पुढे धावायला जायची. मला पोहोता येत नव्हतं. १० फुटांवरून जेव्हा उडी मारायची होती तेव्हा ते पाणी बघूनच माझी तयारी होत नव्हती, पण बरोबरीच्या सहकाऱयांनी इतके इन्करेज केलं की, मी उडी मारली ती केवळ त्यांच्यामुळेच. चढाई करतानाचाही असाच अनुभव आहे. त्यामुळे यामध्ये माझ्या एकटीचे श्रेय आहे असे नाही, मला प्रोत्साहन देणाऱयांची साथ मोलाची आहे. पीटी करतानाही ४० किलो मीटरचे रनिंग पूर्ण करून आपण पीटी करतो आहोत, याचा विसर पडला. मी प्रशिक्षणाला कधी सुरुवात केली आणि ते कधी संपले हे समजलेसुद्धा नाही.

संतोषने जिथे काम केले आहे, तिथे मला काम करायला मिळते ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. समुद्राचे पाणी गोड करण्याचा हा खारीचा प्रयत्न आहे.