परिचारिका-कर्मचाऱ्यांचा कापलेला पगार आजपासून जमा होणार

सामना ऑनलाईन, मुंबई

बायोमेट्रिक हजेरीच्या घोळामुळे परिचारिका-कर्मचाऱ्यांचा कापलेला पगार उद्यापासून खात्यावर जमा करण्यात येणार आहे. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या जोरदार आंदोलनानंतर वैद्यकीय संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी हे आश्वासन दिले. यामुळे पगार कापलेल्या हजारो कर्मचाऱयांना दिलासा मिळाला.

बायोमेट्रिक हजेरी अचानक पगाराला लिंक केल्यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. केईएम रुग्णालयातील परिचारिकांसह पालिकेच्या हजारो कर्मचाऱयांना फक्त १००, २०० रुपयांपासून १-२ हजारांपर्यंत पगार आला आहे. प्रशासनाच्या या हलगर्जी कारभाराविरोधात म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने केईएम रुग्णालयात जोरदार आंदोलन करण्यात आले. कार्याध्यक्ष सुनील चिटणीस, उपाध्यक्ष रंजना नेवाळकर, सरचिटणीस सत्यवान जावकर, ऍड. रचना अग्रवाल, चिटणीस हेमंत कदम, प्रकाश वाघधरे, वृषाली परुळेकर, सीताराम बोडके, संजय वाघ, अजय राऊत, महेश गुरव, रामचंद्र लिंबारे, अतुल केरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. वैद्यकीय संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. अविनाश सुपे यांना यावेळी घेराव घालून कापलेला पगार तातडीने जमा करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी डॉ. सुपे यांनी उद्यापासून पगार जमा करण्यात येतील असे आश्वासन दिले.

सर्व मागण्या पूर्ण होणार

बायोमेट्रिक हजेरी पद्धत पगाराला लिंक करण्याआधी या पद्धतीमधील त्रुटी दूर करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत या पद्धतीमधील त्रुटी लवकरच दूर करण्यात येतील असे आश्वासन दिले. अर्जित व नैमित्तिक रजाही देण्यात येईल. कामगार-परिचारिका यांच्या सार्वजनिक सुट्टय़ांचे नुकसान होऊ देणार नाही, कामगार धोरण पूर्वीप्रमाणेच सुरू राहील असे आश्वासन यावेळी कामगार सेनेला प्रशासनाने दिले.