Love story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूड अभिनेता सलमान खान दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या चित्रपटामध्ये काम करणार आहे. 1999मध्ये आलेल्या भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटामध्ये सलमान खान दिसला होता. यानंतर दोघांनी एकही  मोठा चित्रपट केला नाही. परंतु आता तब्बल 19 वर्षानंतर हे दोघे एकत्र येणार आहेत. तरन आदर्श यांनी एक ट्वीट करत याची माहिती दिली असून भन्साळी लव्हस्टोरीवर आधारित चित्रपट बनवणार असून यात सलमान खानची भूमिका असणार आहे.

1999 मध्ये आलेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या यशानंतर दोघांनी एकत्र काम केले नव्हते. परंतु गेल्या काही काळात दोघेही एकमेकांसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे बोलले जात आहे. भन्साळी यांचा चित्रपट म्हणजे काहीतरी भव्यदिव्य असणारच. त्यामुळे एखाद्या ऐतिहासिक पात्राची लव्हस्टोरी असण्याची शक्यताही काहींनी व्यक्त केली आहे. लवकरच या चित्रपटाचे शूटिंगही सुरू होणार आहे.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, पद्मावत या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी भन्साळी यांनी आगामी चित्रपटाची कथा सलमानला सांगितली होती. त्यावेळी भन्साळी एकाचवेळी तीन स्क्रिप्टवर काम करत होते. अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत त्यांची बोलणी सुरू होती, परंतु अखेर त्यांनी सलमानला घेऊन चित्रपट काढण्याची निश्चित केले. सलमानच्या या चित्रपटामध्ये सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री असणार असल्याचीही चर्चा आहे. सध्या सलमान दबंग 3च्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने भन्साळींच्या चित्रपटाच्या शूटिंगच्या तारखा निश्चित झालेल्या नाहीत.