आहारात एवढं ठेवा मीठाचे प्रमाण

>>शमिका कुलकर्णी, आहारतज्ञ

मीठ… चमचाभर मीठ संपूर्ण जेवणाची रुची वाढवते. पण मिठाचे अनावश्यक, अतिरिक्त प्रमाण मात्र थेट तब्येतीवरच बेतते.

मीठ आपल्या आहारातील अविभाज्य अंग. मिठाखेरीज कोणताही पदार्थ अपूर्णच. पण यातून अगदी प्रत्येक पदार्थात चिमूटभर तरी मीठ घालण्याची सवय हाताला लागतेच… आणि बऱ्याचदा ते मीठ अगदी अनावश्य्क असते. काही घरांतून तर अगदी गोड पदार्थांतसुद्धा मिठाची चव दिली जाते. पुरणपोळी, मोदकाची पारी यात अनावश्यक मिठाची चव मी अनेकदा चाखली आहे.

काहीजणांचा असा उगीचच समज असतो की, ‘मला जरा मीठ जास्तच लागते’. पण हे जास्त मिठाचे कौतुक बऱ्याचदा तब्येतीवर बेतते. आपण सहज तोंडात टाकत असलेले बाहेरचे पदार्थ बऱ्याचदा अनावश्यक मीठ सोबत घेऊन येतात.

आपल्या आहारात मिठाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेवण करताना भाजी, आमटी, कोशिंबीर व इतर आंबट, तिखट पदार्थांमध्ये मीठ चवीपुरते घालणे गरजेचे असते. ते नाही घातले तर त्या पदार्थाला काही चव उरत नाही. जर मीठ जास्त झाले तर तो पदार्थ खावासाच वाटत नाही. म्हणूनच योग्य व मोजक्या प्रमाणात मिठाचा वापर केला पाहिजे.

मिठात अनेक उपयुक्त खनिजे असतात. सोडियम, क्लोराइड व विकतच्या मिठात आयोडिनही असते. हे घटक शरीराला आवश्यक असतात. मीठ कृमीनाशक असते. घसा निरोगी ठेवण्यात मदत होते. मिठाने दात निरोगी राहतात व तोंड स्वच्छ राहते. मीठ शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. मिठाने अन्नाची चव समाधान देते. मीठ थकवा दूर करण्यास मदत करते. पण हे फायदे मिठाचा योग्य प्रमाणात उपयोग केल्याने शरीराला मिळतात. जर मिठाचा वापर जास्त होत असला तर शरीराला हानीकारक ठरते.

सध्या अनेक जणांना मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला जाते. अधिक मीठ खाल्ल्यास रक्तदाब वाढू शकतो. वाढलेल्या रक्तदाबामुळे शरीराला हानी होऊ शकते. हृदयविकार होऊ शकतो. शरीरात अधिक मिठामुळे पाणी साठून राहते व सूज येते. अधिक मिठामुळे शरीरातील कॅल्शियम शरीरातून बाहेर टाकले जाते व हाडे ठिसूळ होतात. म्हणून आहारात मोजके किंवा थोडे कमी मीठ खाणे गरजेचे असते. पूर्वी संतुलित आहारात मिठाचे योग्य प्रमाण असायचे. आतासुद्धा घरी शिजवलेल्या जेवणात मिठाचे प्रमाण नियंत्रितच असते, पण आपल्या खाण्याच्या बदललेल्या पद्धतीमुळे शरीरात मिठाचे प्रमाण जास्त जाते. आपल्या आहारात अनेक बाहेरचे तयार पदार्थ, बेकरीचे पदार्थ, फास्ट फूड यांचा समावेश असतो. या सर्व पदार्थांमुळे आपल्या शरीरात गरजेपेक्षा जास्त मीठ जाते.

प्रत्येकानेच मिठाच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. मात्र फक्त जेवणातील मीठ कमी करून उपयोग होत नाही तर इतर अनेक पदार्थांचा आहारात समावेश कमी करणे गरजेचे असते. अनेकांना बाहेरच्या तयार पदार्थांमध्ये लपलेले मिठाचे घटक असतात हे माहीत नसते. काही सोप्या उपायांनी आपण आपल्या आहारात मिठाचे प्रमाण कमी करू शकतो. प्रत्येकानेच हे बदल जर जेवणाच्या पद्धतीत केले तर आपोआप मिठाचे प्रमाण शरीरात कमी जाईल आणि निरोगी आयुष्य जगण्यास मदत होईल.

मीठ कमी करण्यासाठी…

– जेवण करताना भाजी, आमटी, कोशिंबीर व इतर पदार्थांत मीठ बेताचे घालावे.

– जेवताना पानात वेगळे मीठ घेऊ नये.

– जेवणात लोणची, पापड, चटण्यांचा समावेश कमी करावा किंवा लोणची आणि चटण्या घरी करून त्यात कमी प्रमाणात मीठ घालावे. विकतचे लोणचे किंवा चटण्या खाणे अयोग्य आहे. त्यात टिकवण्यासाठी मिठाचे प्रमाण जास्त असते.

– जेवण चविष्ट करण्यासाठी मीठ कमी अन् विविध मसाले घालावेत.

– चाट मसाल्याचे प्रमाण कमी असावे. खडे मीठ किंवा सैंधव मीठ जरी साध्या मिठापेक्षा चांगले असले तरी त्याचा वापरसुद्धा बेताचा आणि मोजका करावा.

– बाजारात मिळणारे फरसाण, शेव, चकल्या, चिवडा व इतर नमकीन पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आहारात त्याचा समावेश कमीतकमी करावा. चिवडा, शेव किंवा चकल्या घरी करून खाण्याचा प्रयत्न करावा.

– फास्ट फूडचे पदार्थ, बाहेरची सूप या सर्वांमध्ये मिठाचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त असते. त्याचा आहारात समावेश नियंत्रित ठेवावा.

– बेकरीचे पदार्थ खाणे वर्ज्य किंवा कमीतकमी खाणे गरजेचे आहे. इतर पदार्थांपेक्षा बिस्कीटे खाताना नियंत्रण ठेवले पाहिजे. हल्ली अनेक बिस्कीटे ‘हेल्दी’ किंवा ‘हाय फायबर’ या कारणाखाली लोक खाताना दिसतात. पण यात मीठ जास्त असते.