२ हजारांच्या नोटांची छपाई बंद? संसदेत रणकंदन

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दोन हजार रुपयांची नोट बंद होणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असताना हा मुद्दा संसदेमध्ये उचलण्यात आला आहे. समाजवादी पार्टीचे खासदार नरेश अग्रवाल यांनी दोन हजारांची नोट बंद होणार की नाही याचे सरकारने संसदेत आधी स्पष्टीकरण द्यावे असे म्हटले. सरकारने रिझर्व्ह बँकेला २ हजारांच्या नोटा बंद करण्याचा आदेश का दिला आहे याचेही स्पष्टीकरण द्यावे असे अग्रवाल यांनी म्हटले आहे.

नरेश अग्रवाल यांनी उपसभापती पी. जे. कुरियन यांच्यासमोर हा मुद्दा उपस्थित केला आहे. ‘रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांचे ३.२ लाख रुपयांच्या नोटा छापल्या आहेत. मात्र सरकारने आणखी नोटा छापण्यास नकार दिला आहे. नोटाबंदीचा आदेश रिझर्व्ह बँकेने नाही, तर सरकारने घेतला होता. रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी याला विरोध केला होता, मात्र सरकारने आपले म्हणले रेटून धरत नोटाबंदीचा निर्णय घेतला, असेही अग्रवाल म्हणाले.

२ हजाराची नोट बंद होणार?; २०० ची येणार

काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांनीही या निर्णयावर टीका केली आहे. ‘सरकार रोज नवनवीन घोषणा करत आहे. कधी १ हजारांचे कॉईनची तर कधी २०० रुपयांच्या नोटेची, तर कधी ५०० रुपयांच्या कॉईनची छपाई होणार बातम्यात येत आहेत. मात्र सत्य काय आहे ते सरकारने स्पष्ट करायला हवे. खरंच १००० रुपयांचे कॉईन येणार आहे का? असा प्रश्न आझाद यांनी उपस्थित केला. यावर उपसभापतींनी अरुण जेटली यांनी काही स्पष्टीकरण देणार आहात का असे विचारले. यावेळी जेटलींनी मौन राहणे पसंत केल्याने विरोधकांनी आणखी तीव्र शब्दात हल्ला केला.

जदयुचे खासदार शरद यादव यांनी अरुण जेटली यांच्या मौन राहण्यावर टीका करत सरकार २ हजारांच्या नोटांबाबत अधिक माहिती देण्यास का घाबरत आहे. देशात अनेक अफवा पसरत असून अनेकांनी २ हजारांच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला आहे. सरकारने यावर उत्तर देणे आवश्यक असल्याचे यादव म्हणाले.