संभाजी भिडे गुरुजींची आज नगरमध्ये सभा

सामना ऑनलाईन । नगर

श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांची ‘संकल्प सूवर्णसिंहासनाचा जागर हिंदुत्वाचा’ या उपक्रमांतर्गत नगरमधील पटेल मंगल कार्यालयात आज सभा होणार आहे. या सभेला आरपीआय व इतर संघटनांचा विरोध असून या संघटनांनी सभेवर ‘एल्गार मोर्चा नेण्यााचा इशारा दिला आहे. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सभेच्या ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

‘संकल्प सूवर्णसिंहासनाचा जागर हिंदुत्वाचा’ या उपक्रमांतर्गत आज नगरमध्ये भिडे गुरुजी दाखल झाले आहेत. शनिवारी रात्रीपर्यंत या सभेला परवानगी देण्यात आलेली नव्हती. मात्र रात्री उशीरा विविध अटी घालून सभेला परवानगी देण्यात आली. या सभेला परवानगी न देण्याची मागणी आरपीआय व इतर आंबेडकरवादी संघटनांनी केली होती. जर सभेला परवानगी दिली तर या संघटनांनी कार्यकर्ते सभेच्या ठिकाणी मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता.

या सभेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चार पोलिस उपअधिक्षक, सहा ते सात पोलिस निरीक्षक, सोळा सहायक पोलिस निरीक्षक, दोनशे पोलिस कर्मचारी, दोन एसआरपीच्या तुकड्या व सहा आरसीपीच्या तुकड्या सभेच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात करण्यात आले आहेत.