संभाजीनगर महापालिकेकडून जीवन प्राधिकरणकडे 75 कोटींचा निधी वर्ग

शासनाने समांतर जलवाहिनी प्रकल्पावेळी दिलेला निधी महापालिकेकडून तसाच पडून आहे. त्यातील 187 कोटी रुपये शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी जीवन प्राधिकरणला देण्याचे आदेश राज्य सरकारने महिनाभरापूर्वी दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने अखेर 75 कोटी 76 लाख रुपयांचा निधी जीवन प्राधिकरणकडे वर्ग केला आहे.

समांतर जलवाहिनीचा प्रकल्प डब्यात गेल्यानंतर राज्य सरकारने संभाजीनगर शहरासाठी 1680 कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. सध्या जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून या योजनेचे काम सुरू आहे. या योजनेसाठी 70 टक्के निधी राज्य शासन देणार असून, 30 टक्के निधी महापालिकेला द्यावा लागणार आहे. आतापर्यंत शासनाने या योजनेसाठी केवळ 17 कोटी 44 लाख रुपयेच उपलब्ध करुन दिले होते. हा निधी अपुरा असल्याने जीवन प्राधिकरणने शासनाकडे निधीची मागणी केली होती. त्यावर शासनाने महापालिकेला त्यांच्याकडे पडून असलेला समांतरचा 187 कोटींचा निधी जीवन प्राधिकरणकडे वर्ग करण्याचे आदेश महिनाभरापूर्वी दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या लेखा विभागाने दोन दिवसांपूर्वीच जीवन प्राधिकरणला 75 कोटी 76 लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे आता पाणी योजनेच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी शासनाने जीवन प्राधिकरणकडे निधी वर्ग करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार समांतरच्या निधीतून 75 कोटी 76 लाख रुपयांची रक्कम दोन दिवसांपूर्वीच वर्ग करण्यात आली आहे.
– संतोष वाहुळे, मुख्य लेखाधिकारी.