रामपूर येथे रेल्वे अपघात, मालगाडीचे डबे रुळावरून घसरले

उत्तर प्रदेशातील रामपूर रेल्वे स्थानकावर मालगाडीचा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मालगाडी रुळावरुन घसरल्याने रात्री उशिरा हा अपघात झाला आहे.अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि इंजिनीअरिंग टीमचे सदस्य घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी ट्रॅक मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.

मिळालेल्या माहितींनुसार, ही घटना मुरादाबादमधील रामपूर रेल्वे स्टेशनच्या यार्डजवळ घडली. मालगाडीच्या दोन वॅगनची चाके रेल्वे रुळावरून घसरली होती. त्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक गाड्या इतर स्थानकांवर थांबवाव्या लागल्या आहेत, तर अनेक गाड्या चंदौसी मार्गे वळवण्यात आल्या आहेत.दरम्यान, रेल्वे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

याप्रकरणी मुरादाबादचे डीआरएम आरके सिंह यांनी या अपघाताची पाहणी केली. यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मालगाड्यांचे दोन डबे रुळावरून घसरले आहेत. त्यामुळे दिल्ली ते लखनौपर्यंतचा मार्ग प्रभावित झाला आहे. लवकरच हा मार्ग पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. तसेच सर्व व्यवस्था तपासल्या जात आहेत. या घटनेत कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.