शिवसेना जिल्हाप्रमुखपदी संभाजी शिंदे यांची निवड

7

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

भाळवणी पंचायत समिती सदस्य, शिवसेना विद्यमान पंढरपूर तालुका प्रमुख आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य संभाजीराजे शिंदे यांची शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा प्रमुखपदी (पंढरपूर विभाग) निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिंदे यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या. शिंदे यांच्या निवडीचे दैनिक सामना मधून वृत्त प्रसिद्ध होताच सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला.

संभाजीराजे शिंदे हे शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून गेली 25 वर्षे निष्ठेने शिवसेना पक्षाची धुरा खांद्यावर घेवून कार्य करत आहेत. त्यामुळे त्यांना कार्यक्षमता आणि पक्षनिष्ठेचे फळ मिळाले असून गेल्या 15 वर्षापासून शिवसेना तालुका प्रमुख काम करत आहेत. तसेच भाळवणी गटातून ते विद्यमान पंचायत समिती समिती सदस्य असून यापूर्वीही ते दोन वेळा सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती सदस्यपदी निवड झाल्यानंतर त्यांनी चांगल्या निर्णयात पुढाकार घेतला आहे. त्याचबरोबर दोन दिवसापूर्वी एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनीही शिंदे यांच्या कामाची दखल घेवून महाराष्ट्र राज्य कामगार सेना पंढरपूर आगार अध्यक्षपदीही निवड केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात अनेक ठिकाणी शिवसेनेचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेले आहेत. त्यांच्या या निवडीचा शिवसेनेला माढा लोकसभा मतदारसंघात चांगला फायदा होणार आहे. यावेळी शिवसेनेचे उपनेते तानाजी सावंत, नूतन सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, सहसंपर्कप्रमुख तथा भैरवनाथ शुगरचे व्हाइस चेअरमन प्रा. शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख (सोलापूर विभाग) गणेश वानकर आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निष्ठेचे फळ व कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळेच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी माझी जिल्हाप्रमुखपदी निवड केली आहे. येथून पुढेही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका पार पाडणार असून पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवून पक्षवाढीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे संभाजी शिंदे यांनी सांगितले.