‘संभाजी’… एक धगधगता इतिहास

  • नितीन फणसे

शंभूराजे. महाराजांइतकीच ज्वलंत, तेजस्वी व्यक्तिरेखा. येत्या रविवारपासून झी मराठीवर सुरू होणाऱ्या ‘संभाजी’ या मालिकेनिमित्त डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी बातचित…

डॉ. अमोल कोल्हे… खणखणीत ऐतिहासिक भूमिका कुणी करावी तर त्यांनीच… छत्रपती शिवाजी महाराजांची अभिमान वाटावा अशी भूमिका त्यांनी साकारली. त्यानंतर मराठी माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणारी भूमिका त्यांनी ‘मराठी टायगर्स’ या सिनेमात साकारली… आणि आता येत्या रविवारपासून सुरू होत असलेल्या ‘संभाजी’ या मालिकेत ते संभाजी राजांच्या आक्रमक आणि तेवढ्याच तेजस्वी भूमिकेतून येत आहेत. पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिका साकारायला मिळाल्याबद्दल ते म्हणतात, ‘मी माझ्या स्वराज्याच्या पहिल्या अभिषिक्त युवराजाची आणि दुसऱ्या अभिषिक्त छत्रपतींची भूमिका करतोय याचा निश्चितच अभिमान काटतो. काबुल ते बंगाल सल्तनत असलेल्या औरंगजेबाला ज्याने दख्खनमध्ये वणवण भटकायला लावून त्याला शेवटचा श्वास घ्यायला लावला ती भूमिका करतोय. त्यावेळी अनेकांची मदत झाली. या भूमिकेपेक्षा या सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्यात मला खूप आनंद झाला. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे असं चैतन्य आहे ते अंगात असलं तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शंभूराजांविषयी बोलताना अमोल म्हणाले, शंभूराजे म्हणजे शिवरायांचे पुत्र यापलिकडे आपण सहसा पाहात नाही. पण हा केवळ बापकमाईवर अय्याशी करणारा युवराज नव्हता, तर वडिलांचं स्वप्न पूर्ण करणारा तेजस्वी वारसदार होता हे फारसं कुणाला ठाकूक नाही. संभाजी महाराजांनी आपल्या ९ वर्षांच्या कारकीर्दीत सुमारे १६८ युद्धे केली. पण यातलं एकही युद्ध ते हरले नाहीत. ४ ग्रंथांचे लेखन करणारे ते साहित्यिक होते. हिंदुस्थानात त्यावेळी बोलल्या जाणाऱ्या १६ भाषांचं त्यांना ज्ञान होतं. ९ वर्षांत शिवरायांपेक्षा दीडपट जास्त साम्राज्यविस्तार त्यांनी केला. जहाजे बांधण्याचे ५ कारखाने त्यांनी उभारले होते.

निर्माता म्हणून वेगळेपण
आपण या मालिकेचे निर्माता असलो तरी यात मी एकटा नाही, अशी नम्र भूमिका डॉ. अमोल घेतात. त्यांच्या मते ते केवळ निमित्तमात्र आहेत. ते म्हणतात, या मालिकेत माझे दोन पार्टनरही आहेत घनश्यामराव, विलास सावंत, डीओपी निर्मल जानी, रवी दिवाण, संदीप कुलकर्णी, कॉस्च्युम्ससाठी पूर्णिमा ओक, मेकअपसाठी सुहास गोमते, संवादलेखक प्रतापदादा गंगावणे आम्ही सगळे गेली आठ वर्षे एक स्वप्न डोळ्यांत घेऊन चाललो होतो. हे माझं प्रोजेक्ट आहे असा विश्वास घेऊन प्रत्येकजण काम करत होता.

दोन्ही भूमिका जवळच्या
शिवराय आणि संभाजीराजे यापैकी कोणती भूमिका जवळची मानता असं विचारता ते म्हणाले, महाराज साकारताना मी नतमस्तक असतो. कारण त्यांनी खूप करून ठेवलंय. साडेतीनशे वर्षांनंतरही महाराष्ट्रात एकही नरडं असं भेटणार नाही जे ‘शिवाजी महाराज की’ म्हटल्यावर ‘जय’ असं म्हणणार नाही… त्यामुळे ती भूमिका साकारताना मी नतमस्तक होतोच. पण शंभूराजांची भूमिका करताना मी आतून पेटून उठतो. त्यांचा इतिहास आजच्या पिढीला माहीत नाही याचा विचार येतो तेव्हा पेटून उठतो. माझी ही भूमिका बघितल्यावर कमितकमी एका तरी तरूणाने शंभूराजांचा इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे ही तडक मनात उठते.