खून झालेल्या तरुणाच्या पित्याची याचिका फेटाळली

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

खुनी तरुण हा मनोरुग्ण नाही. त्यामुळे त्याच्याविरोधात न्यायालयात सुनावणी घेण्याचे आदेश व्हावेत, अशा आशयाची याचिका ज्या तरुणाचा खून झाला त्याच्या पित्याने खंडपीठात दाखल केली होती. मात्र वैद्यकीय अहवाल हे खुनाचा आरोप असलेला तरुण मनोरुग्ण असल्याचे सांगतात, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपीठाचे न्यायमूर्ती पी.डी. नाईक यांनी ही याचिका फेटाळून लावली आणि सत्र न्यायालयाचा ‘खुनाचा आरोप असलेला तरुण मनोरुग्ण असल्यामुळे सुनावणी स्थगित ठेवण्याचा’ आदेश कायम ठेवला.

२०१३ मध्ये मौलाना आजाद महाविद्यालयाच्या समोर फजल सिकंदर पटेल या तरुणाने आसिफखान नावाच्या तरुणाच्या डोक्यात फरशी घातली होती व त्यात आसिफचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात फजलच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि पोलिसांनी त्याचा तपास पूर्ण करून त्याच्याविरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. २०१४ साली फजल याच्यावतीने सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता की, तो मानसिक रुग्ण आहे आणि फौजदारी प्रक्रिया संहितेत अशी तरतूद आहे की, मानसिक रुग्ण असलेल्या आरोपीच्या विरोधात तो जोपर्यंत बरा होत नाही तोपर्यंत सुनावणी घेता येणार नाही. या तरतुदीआधारे त्याला मानसिक उपचारासाठी वेड्यांच्या दवाखान्यात दाखल करावे अथवा जामीन अर्ज मंजूर करावा.

मयताच्या वडिलांची हायकोर्टात धाव

सत्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला होता. त्याविरोधात फजल पटेल याने हायकोर्टात याचिका दाखल केली होती व न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेतील तरतुदीनुसार सुनावणीबाबत निर्णय घेण्याचे सत्र न्यायालयाला आदेश दिले होते. त्यानंतर त्याच्या वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या. त्यात तो मनोरुग्ण असल्याचे अहवाल प्राप्त झाले. त्याआधारे सत्र न्यायालयाने फैजल याच्याविरोधातील सुनावणी स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला मयत आसिफ खान याच्या मयताचे वडील युसूफ खान यांनी अ‍ॅड. सागर लड्डा यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल करुन आव्हान दिले होते. खंडपीठात सुनावणी झाली असता लड्डा यांनी आरोपी फजल हा मनोरुग्ण नाही, असा दावा विविध मुद्यांच्या आधारावर केला. सर्वोच्च न्यायालयाचे निवाडेही सादर केले.

वैद्यकीय अहवाल ठरला महत्त्वाचा

आरोपीच्या फजलच्या वतीने अ‍ॅड. राजेंद्र देशमुख व अ‍ॅड. अभयसिंग भोसले यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, वैद्यकीय अहवाल हे आरोपी मनोरुग्ण असल्याचे सांगतात. त्याच्या मानसिक स्थितीबाबतचा १६८ पानांचा अहवाल सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला. त्याआधारे सत्र न्यायालयाने आरोपी हा मानसिक रुग्ण असल्याचा निर्वाळा दिला होता. परिणामी कायद्यातील तरतुदीनुसार आरोपीविरुध्द खटला स्थगीत ठेवणेच योग्य आहे व तसा सत्र न्यायालयाचा निर्णय योग्य आहे. हा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून मयताच्या पित्याने केलेली याचिका फेटाळली.