एकच एटीएम दोन महिन्यांत दुसऱ्यांदा फोडले

सामना प्रतिनिधी । नागपूर

एटीएम फोडून त्यातील रक्कम लंपास करणे हे काम कठीण मानले जात असले तरी अज्ञात लुटारूंनी एकच एटीएम दोन महिन्यांत दुसऱ्यांदा फोडले. विशेष म्हणजे, पहिल्याच घटनेतील लुटारूंना हुडकून काढण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही. त्यातच ही दुसरी घटना घडली. यावेळी लुटारूंनी या एटीएममधून १९ लाख ७३ हजार ४०० रुपयांची रोकड लंपास केली. त्यामुळे एटीएमच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरगाव येथे गुरुवारी मध्यरात्री घडली असून, शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

हिंगणा तालुक्यातील डोंगरगाव येथे डोंगरगाव – गुमगाव मार्गावर बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. येथे एकाच खोलीत दोन एटीएम मशीन बसविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, हा परिसर गजबजलेला आहे. हे एटीएम २४ तास सुरू असायचे. मात्र, दरोडेखोरांनी दोन महिन्यांपूर्वी या एटीएमला लक्ष्य करीत ते फोडून त्यातील रक्कम लंपास केल्याने रात्रीच्यावेळी ते बंद करण्यात येत होते. शिवाय, एटीएमच्या खोलीचे शटरही बंद केले जायचे.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी एटीमएच्या परिसरात राहणाºया नागरिकांना एटीएमच्या खोलीचे शटर उघडे दिसले. त्यांनी त्या खोलीची पाहणी केली असता, आतील दोन्ही एटीएम मशीन फोडल्या असल्याचे तसेच मशीनमध्ये रोख रक्कम ठेवण्याचे ट्रे जवळच्या कचऱ्यात फेकण्यात आले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे लगेच हिंगणा पोलिसांना सूचना देण्यात आली.

माहिती मिळताच पोलीस उपायुक्त शिंदे व हिंगण्याचे ठाणेदार बारापात्रे यांनी घटनास्थळ गाठून या दोन्ही मशीनची पाहणी केली. लुटारूंनी या दोन्ही मशीन गॅस कटरच्या मदतीने व्यवस्थित कापल्या आणि त्यातील रोख रक्कम ठेवण्याचे तीन ट्रे बाहेर काढून त्यातील १९ लाख ७३ हजार ४०० रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. लुटारूंनी जाताना तिन्ही ट्रे जवळच्या कचऱ्यात फेकून दिले होते. एकच एटीएम दुसऱ्यांदा फोडण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी बँक शाखा व्यवस्थापक नरेंद्र धोटे यांच्या तक्रारीवरून अज्ञात लुटारूंविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

लुटारूंनी डोंगरगाव येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम दुसऱ्यांदा फोडले. पहिल्यावेळी या एटीएममधून १० लाख रुपये लांबवण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी या एटीएममध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात यावे तसेच येथे कायमस्वरुपी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी सूचना बँक व्यवस्थापनाकडे केली होती. मात्र, बँक व्यवस्थापनाने पोलिसांच्या या सूचनेकडे दुर्लक्ष केले आणि दुसऱ्यांदा एटीएम फोडण्याची घटना घडली. विशेष म्हणजे, घटनेच्या रात्रीही येथील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.