लेख : तुर्कस्तानची चलन चिंता

>>सनतकुमार कोल्हटकर<<

[email protected]

तुर्कीच्या लिराची डॉलर्सच्या तुलनेत सुरू असलेली घसरण कुठपर्यंत जाते याकडे जगाचे लक्ष आहे. या चलनयुद्धामुळे तुर्कीमध्ये स्थानिकांमध्ये असंतोष उद्भवू शकतो. सध्या आखातात अनेक देशांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण असतानाच तुर्की, इराणमधील असंतोष आखातातील अस्थिरतेचा वणवा किती भडकवतो याचीच उत्सुकता आहे. तुर्कीला लागून असणाऱ्या युरोपचे चलन युरोचीही घसरण सुरू झालेली दिसते आहे.

युरोप व आखाती प्रदेशांना जोडणारा दुवा म्हणून तुर्कस्तानकडे बघितले जाते. युरोपची प्रागतिकता आणि मध्य पूर्व देशांच्या संस्कृतीच्या खुणा तुर्कस्तानमध्ये एकत्र आढळतात. तुर्की हा पूर्वीपासून युरोप आणि अमेरिकेच्या जवळील देश म्हणून ओळखला जात होता. परंतु 2011 नंतर आखातातील अरब स्प्रिंग घडामोडी आणि विशेषतः सीरियामध्ये गृहयुद्ध सुरू झाल्यापासून तुर्कीची आंतरराष्ट्रीय समीकरणे बिघडण्यास सुरुवात झाली. ‘इसिस’ने सीरियाच्या मोठय़ा भूभागावर कब्जा केल्यानंतर तुर्की आणि सीरियाच्या सीमेलगत सीरिया आणि इराकमधील तेल विहिरींमधून होणारा क्रूड तेलाचा उपसा ‘इसिस’मार्फत कमी दरात तुर्कीला होत असल्याचे अनेक आरोप तुर्कीवर झाले. पण जसजशी ‘इसिस’ सीरियातून हटण्यास सुरुवात झाली आणि सीरिया – तुर्कीच्या सीमेलगत राहणारे ‘कुर्द’ वंशाचे लोक आक्रमक झाले तस तसे तुर्कीच्या प्रतिसादात फरक पडू लागला. तुर्कीमध्ये कुर्दांची संख्या बरीच आहे आणि आताच्या नवीन तुर्कीच्या संसदेत कुर्द वंशाचे बरेच लोक निवडून आले आहेत. सीरियामध्ये ‘इसिस’विरोधात लढण्याकरिता अमेरिकेने सीरियातील कुर्द वंशाच्या लोकांना बराच शस्त्रपुरवठा आणि इतर मदतही केली होती. परंतु  तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगेन कुर्द वंशांच्या लोकांविरोधात उभे होते. सीरियातील कुर्द वंशाच्या लोकांना अमेरिकेने मदत केल्याबद्दल एर्दोगेन यांनी वेळोवेळी अमेरिकेवर जोरदार टीकाही केली होती.

2016 च्या अखेरीस तुर्कीने सीरियातील हवाई हद्दीतून जाणारे रशियाचे विमान खाली पाडले होते. पण सुरुवातीला रशियाबद्दल ताठरपणा दाखविणारे एर्दोगेन यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची सपशेल माफी मागितली आणि तुर्की – रशिया मैत्रीपर्व सुरू झाले. एर्दोगेन अमेरिकेपासून फटकून वागू लागले. त्यानंतर तुर्कीमध्ये झालेल्या लष्कराच्या बंडाळीनंतर एर्दोगेन यांनी अमेरीकेत आश्रयाला असलेल्या मूळच्या तुर्किश गुलेन  यांच्यावर आरोप केला. एर्दोगेन यांनी गुलेन यांना तुर्कीच्या स्वाधीन करण्यास अमेरिकेला सांगितले. पण अमेरिकेने त्याला नकार दिला. तेंव्हापासून अमेरिका आणि तुर्की या दोघांमधील  दुरावा वाढत असल्याचे दिसत होते. अलीकडेच तुर्कीने दोन वर्षांपूर्वी अमेरिकन नागरिक असलेल्या एका  ख्रिश्चन धर्मगुरूला (अँड्रय़ू ब्रुन्सन) तुरुंगात ठेवले आहे. दहशतवाद्यांशी संबंध ठेवल्याच्या आरोपावरून त्याला अटक केली होती. या घटनांमुळे तुर्की आणि अमेरिका यांच्यातील संबंध विकोपाला गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अँड्रय़ूला सोडण्याच्या बदल्यात अमेरिकेच्या तुरुंगात असणारा ‘मेहमेत हाकन अतिला’ या तुर्कीच्या बँकरला सोडण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच इस्रायली तुरुंगातील तुर्कीचा नागरिक एब्रु ओझंकान यालाही अमेरिकेच्या विनंतीवरून तुर्कीच्या हवाली करण्यात आले.

तुर्कीने साधारण 100 अब्ज युरोचे कर्ज युरोपियन युनियन  घेतलेले आहे. तुर्कीने रशियाकडून ‘क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा  एस.400’ ही विकत घ्यावयाचे ठरविले आहे. या सर्वांचा परिपाक म्हणून की काय, उत्तरोत्तर अमेरिकेबरोबर बिघडतच चाललेल्या संबंधांदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अमेरिका प्रथम’ या धोरणानुसार जगातील अनेक देशांबरोबर व्यापारयुद्ध छेडले आहे. या व्यापारयुद्धामुळे चीन, कॅनडा आणि युरोपीय देशांच्या अमेरिकेबरोबरील व्यापारामध्ये खळबळ आणि चढउतार सुरू झाले. तुर्कीही अमेरिकेला स्टील आणि ऍल्युमिनिअमचा पुरवठा करतो. अमेरिकेने स्टील आणि ऍल्युमिनिअमवर आयातकर वाढविले आहेत. तुर्कीच्या स्टीलच्या निर्यातीमध्ये 13 टक्के स्टील अमेरिकेला निर्यात होते. पण तुर्कीतून अमेरिकेमध्ये येणाऱ्या स्टील आणि अल्युमिनिअमवर अमेरिकेने 20टक्के आणि 50 टक्के आयातकर लादला आहे. यामुळे तुर्कीला अमेरिकेबरोबरील व्यापारात मोठा फटका बसण्यास सुरुवात झाली असून डॉलर्सची तुर्कीकडील उपलब्धता कमी होण्यास सुरुवात झाली. तुर्कीला आता डॉलर्सच्या स्थानिक मागणीवर नियंत्रण आणण्यासाठी  ‘व्याजदर’ वाढविण्याशिवाय गत्यंतर नाही. तुर्की अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करणारे विदेशी गुंतवणूकदार आता जास्त परतावा मागत आहेत. जास्त परतावा म्हणजे जास्त व्याजदर. तुर्कीचा यालाच विरोध आहे. एर्दोगेन यांनी नागरिकांना डॉलर, युरो ही चलने तेथील बँकांकडे जमा करण्याचे आवाहन केले आहे.

तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगेन यांचे जावई बेरात एल्बार्याक हेच तेथील अर्थमंत्री असून तुर्कीच्या मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर वाढविणे टाळले जात आहे. जानेवारीपासून आतापर्यंत तुर्कीचे चलन ‘लिरा’ची अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 60 टक्क्यांनी घसरण झाली असून ही मोठी घसरण आहे. या वर्षी जानेवारीत 3.76 लिरा जिथे एका डॉलर मिळत असे तिथे आता 6 लिराला एका डॉलर मिळतो आहे. ही घसरण लवकर थांबण्याची लक्षणे नसून याचा परिणाम आशियातील आणि अनेक देशांच्या चलनावर झाला आहे. हिंदुस्थानच्या रुपयावरही ताण आला असून 70 रुपयाला एका डॉलर हा सध्याचा विनिमय दर  आहे. दक्षिण आफ्रिकेचे चलन रँड आणि फिलिपाइन्सचे चलन  पेसो याचीही मोठी घसरण अनुभवास मिळत आहे. रशियाचे चलन रुबलही डॉलरच्या तुलनेत घसरत आहे. इराणचे चलन रियालने तर डॉलर्सच्या तुलनेत प्रचंड घसरण अनुभवली आहे. 35 हजार रियालला जिथे पूर्वी एका डॉलर मिळत असे तिथे 1 लाख 50 हजार रियालला आता एक डॉलर मिळतो.

तुर्कीच्या लिराची डॉलर्सच्या तुलनेत सुरू असलेली घसरण कुठपर्यंत जाते याकडे जगाचे लक्ष आहे. या चलनयुद्धामुळे तुर्कीमध्ये स्थानिकांमध्ये असंतोष उद्भवू शकतो. सध्या आखातात अनेक देशांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण असतानाच तुर्की, इराणमधील असंतोष आखातातील अस्थिरतेचा वणवा किती भडकवतो याचीच उत्सुकता आहे. तुर्कीला लागून असणाऱ्या युरोपचे चलन ‘युरो’चीही घसरण सुरू झालेली दिसते आहे.

अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिजर्व व्याजदरात वाढ करण्याची लक्षणे असून जागतिक गुंतवणूकदार अमेरिकन डॉलरची जगातील इतर देशातील गुंतवणूक काढून घेऊन अमेरिकेत परत गुंतवू इच्छितात. अमेरिकेत बेरोजगारी दिवसेंदिवस कमी होत आहे. ‘जी.डी.पी ’ वाढत आहे. अमेरिकन लोकांची खर्च करण्याची क्रयशक्ती वाढत आहे.

एर्दोगेन नुकतेच तुर्कीचे अध्यक्ष म्हणून परत निवडून आले असून त्यांनी घटनादुरुस्ती करून घेऊन स्वतःकडे प्रचंड अधिकार घेतले आहेत. त्यांना आता तेथील न्यायालयही सत्ताभ्रष्ट करू शकत नाही.  तुर्कीची अर्थव्यवस्था जगातील 17 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था गणली जाते. एर्दोगेन यांनी अमेरिकेच्या दादागिरीला दाद न देण्याचे ठरविले आहे असे दिसते, पण ते अजून किती दिवस यावर ठाम राहू शकतील हे बघावे लागेल. युरोपला त्यांनी तुर्कीला दिलेल्या 100 अब्ज युरो कर्जाची चिंता लागून राहिली आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. या सर्व घटना अनेक देशांना ‘मंदी’ कडे खेचून नेऊ शकतात.