बेसुमार वाळू उपशामुळे धोका वाढला


सामना ऑनलाईन । वसई

चर्चगेट-डहाणू रेल्वे मार्गावरील वैतरणा नदीवरील दोन्ही पुलांखालून बोटिंगवर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. बेसुमार वाळू उपशामुळे हे पूल धोकादायक बनले असून संभाव्य धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 29 एप्रिलपर्यंत ही बंदी कायम राहणार असून मार्ग बदलण्याच्या नोटिसा बोटचालकांना देण्यात आल्या आहेत.
विरार आणि वैतरणा खाडीवर क्रमांक 92 आणि 93 असे दोन पूल आहेत. त्यापैकी पश्चिम रेल्वेची वाहतूक करणाऱया वैतरणा नदीवरील पुलाची पुनर्बांधणी 1970 मध्ये करण्यात आली होती. याच पुलावरून लोकल ट्रेन, मालवाहतूक गाडय़ा, एक्सप्रेस अशा गाडय़ांची वाहतूक होत असते. असे असूनही या पुलाच्या किनारा परिसरातच मोठय़ा प्रमाणात वाळू उपसा होत असतो. त्यामुळे या पुलाला धोका निर्माण झाला आहे. तसेच या वाळूची वाहतूकदेखील या पुलाखालूनच होत असते. यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याचे रेल्वे प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला कळवले होते. सध्या हा पूल धोकादायक असल्याने या पुलाखालून बोटी नेण्यास बंदी करण्यात आली आहे.पुलाच्या दोन्ही बाजूंनी सहाशे मीटर क्षेत्रात 1 एप्रिलपासून ते 29 मेपर्यंत बोटिंगला बंदी घातली आहे. पोलीस, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, नौदल, मत्स्य व्यवसाय, वन , कोस्ट गार्ड उत्पादन शुल्क असे शासकीय विभाग वगळून इतर सर्वांना ही बंदी लागू आहे.