रेतीमाफियांनी मोडकसागर, वैतरणा खणून काढले

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोडकसागर, वैतरणा या धरणांची सुरक्षा धोक्यात आली आहे. स्थानिक सुरक्षारक्षकांच्या ‘आशीर्वादाने’ तस्करांनी पात्रात मोठमोठय़ा मशिनरी लावून ही धरणे खणूनच काढण्यास सुरुवात केली आहे. धक्कादायक म्हणजे बांगलादेशी घुसखोरांना रेती उपसा करण्यासाठी जुंपले जात असून येथे दिवस-रात्र रेतीचे कारखानेच सुरू करण्यात आले आहेत. भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बेफिकीर कारभारामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांना धोका निर्माण झाला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर, वैतरणा धरणाच्या सुरक्षेसाठी मुंबई महापालिकेने सुरक्षा अधिकारी, कर्मचारी यांच्यासह ठाणे ग्रामीण पोलिसांची नियुक्ती केली आहे. धरण क्षेत्र अवैध बोटीसह घुसखोरी रोखण्याची जबाबदारी ही सुरक्षा कर्मचाऱ्यांवर आहे. मात्र टेंभा, वैतरणा, अजनूप गावातील काही स्थानिकांना बरोबर घेऊन या धरण क्षेत्रात रेतीमाफिया रेती उपसा करीत आहेत. धरणात बोटी उतरवून मशिनरींच्या सहाय्याने मोठय़ा प्रमाणात रेती उपसा करीत आहे. विशेषतः रेती उपसा करण्यासाठी या बोटींवर बांगलादेशी मजूर कार्यरत असून अवैध रेती उपसा व त्यातच बांगलादेशींची घुसखोरी यामुळे धरणाची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.

  • सीसीटीव्हीमध्ये झोल
    खुलेआम रेती उपसा करून सदर रेतीचा साठा टेंभा, वैतरणा, अजनूप, कुंडण, गायदरा परिसरात साठा करून 10 हजार रुपये ब्रासने विक्री केली जाते. परिणामी अवैधरीत्या रेती उपसा करतेवेळी धरण क्षेत्रात लावण्यात आलेले सेटेलाईट तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात येतात असे समजते. दरम्यान बेसुमार रेती उपसा करून धरणांच्या सुरक्षेला सुरुंग लावणाऱ्या बांगलादेशींवर कारवाई होईल का, असा सवाल उपस्थित होत आहे.
  • वाळूत लाकडांचीही वाहतूक
    तानसा, वैतरणा धरणांलगत असलेल्या साग, खैरसारख्या झाडांची कत्तल करून ती लाकडे रेतीच्या ट्रकमधून तस्करी केली जातात. या प्रकाराची संपूर्ण माहिती खर्डी विभागाला माहीत असतानाही त्या तस्करांकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप नागरिक करीत आहेत.