बागलाणच्या वाळू माफियांविरुद्ध धडक मोहीम

प्रातिनिधिक फोटो

सटाणा, (सा.वा.)

बागलाणच्या तहसीलदारांनी वाळू माफियांविरूद्ध धडक मोहिमेस सुरुवात केली. मध्यरात्रीच्या सुमारास सात वाळू व एक मुरूम असलेल्या अशा आठ ट्रॅक्टर्स जप्त करून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा महसूल मिळविला आहे.

तालुक्यातील मोसम, आरम व गिरणा नदीपात्रात खाजगी वाहनाने सापळा रचून तीन भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली. या भरारी पथकाने पहाटे नदीपात्रात जाऊन छापा टाकला असता नामुपर मोसम नदीपात्रात विक्की वसंत सावंत यांचा ट्रॅक्टर वाळू उपसा करताना रंगेहाथ सापडला.
लोहणेर येथील गिरणा नदीपात्रात सुलोचना गंगाधर शेवाळे यांचे सोनालिका ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली. तर आराई येथील विजय पोपट अहिरे यांचेही गिरणा नदीपात्रात वाळू उपसा करताना ट्रॅक्टर पकडले. याच गिरणा नदीपात्रात साहेबराव पोपट सोनवणे, नंदू भास्कर सोनवणे, अशोक दादाजी अहिरे यांचे ट्रॅक्टर्स अनधिकृत वाळू उपसा करतांना आढळून आलेत.ही सर्व आराई येथील वाळू माफिया आहेत. तर लोहणेर नदीपात्रात निकम नामक व्यक्ती वाहन आढळून आले.

चौगाव शिवारात प्रभाकर खंडू सोनवणे यांच्या मालकीचे ट्रॅक्टर वाहन मुरूम वाहतूक करताना सापडला. ही सर्व वाहने जप्त करण्यात आली असून त्यांना सुमारे प्रत्येकी ५६००० हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सुनील सैदाणे यांनी दिली. या भरारी पथकात तहसीलदार सुनील सैंदाणे, नायब तहसीलदार आबा तांबे, सर्कल अधिकारी सी. पी. अहिरे, बी. डी. धिवरे, पी.एम. गोसावी, तलाठी जयप्रकाश सोनवणे, मनोज भामरे आदी सहभागी होते.