अंगावर ट्रॅक्टर घालून तलाठ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न

सामना प्रतिनिधी । आष्टी (बीड)

वाळू उपसा करुन ट्रॅक्टरद्वारे वाळुची वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. पथकासह कारवाई गेलेल्या तलाठ्यास वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकावर आष्टी पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आष्टीतील कानडी शिवारात गेल्या काही दिवसांपासून अवैद्य खनिज उपसा केला जात आहे. नांदा येथील तलाठी अरुण किसन जवंजाळ यांना वाळू चोरीची माहिती मिळाल्याने ते त्यांचे सहकारी अर.बी. जाधव, कोतलवाल अशोक भुकन यांच्यासह घटनास्थळी गेले. त्यावेळी तीन ट्रॅक्टर उभे असल्याचे व काही लोक वाळू उपसा करत होते. जवंजाळ यांनी ट्रॅक्टर चालकास परवानाबाबत विचारणा केली असता तीनही ट्रॅक्टर चालकांनी तेथून पळ काढला. यातील निलेश यादव या ट्रॅक्टर चालकाला अडवून ट्रॅक्टर व ट्रॅक पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचे अरुण जवंजाळ यांनी सांगिचले. मात्र निलेश यादवने तलाठी जंवजाळ यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि तेथून पळ काढला. या प्रकरणी तलाठी जवंजाळ यांच्या फिर्यादीवरुन निलेश यादव सह अन्य दोघांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.