शासकीय कर्मचार्‍यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी चौथ्या आरोपीला अटक

1

सामना प्रतिनिधी । मालवण 

तहसीलदार समीर घारे व दोन तलाठ्यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या चार जणांपैकी चौथा संशयित आरोपी अमोल चव्हाण यालाही मालवण पोलिसांनी शनिवारी सकाळी अटक केली. चव्हाण याला मालवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २२ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बुधवारी रात्री हडी कालावल खाडीपात्रा लगत अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात कारवाईस गेलेल्या तहसीलदार समीर घारे यांच्यासह दोन तलाठ्यांवर डंपर चढवण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर तहसीलदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून मालवण पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला होता. यातील गुंडू राठोड, गुरुप्रसाद आचरेकर, योगेश भिसळे या तिघांना शुक्रवारी  पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

तसेच महसूल प्रशासनाने केलेल्या कारवाईतील पळवून नेलेला डंपर पोलिसांनी चौके येथून ताब्यात घेतला होता. यातील चौथा संशयित आरोपी डंपरचा मालक अमोल चव्हाण याचा पोलीस शोध घेत होते. आज शनिवारी सकाळी पोलीस नाईक शेखर मुणगेकर व मंगेश माने यांनी चौके येथून अमोल हेमंत चव्हाण याला अटक केली.