ठसा : कोफी अन्नान


>> संदीप देशमुख

जगभरात शांतता नांदावी, हेवेदावे, द्वेषभावना संपून परस्परांत एक मैत्र जागावे. सकल समाजाने गुण्यागोविंदाने निरामय जीवन जगावे या आणि अशाच उदात्त विचारांची कास धरून जगाच्या कल्याणा समर्पित भावनेतून काम करणारा एक समाजसेवक नेता म्हणजे कोफी अट्टा अन्नान. संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण महासभेचे माजी महासचिव अशी ओळख असलेले कोफी अन्नान तसे तर कसलेले मुत्सद्दी, पण मानवतेच्या मुद्दय़ावर मात्र आपले संवेदनशील मन आणि विवेकबुद्धीला साक्षी ठेवूनच निर्णय घेणारे अधिकारी. जगाचा कारभार करणाऱया संयुक्त राष्ट्र संघाचे दोन वेळा महासचिवपद भूषविणारे कोफी अन्नान 2001 मध्ये शांततेच्या ‘नोबेल’ पुरस्काराने सन्मानित झाले. हा सर्वोच्च किताब मिळाल्यानंतरही त्यांचे मानव कल्याणाचे कार्य थांबले नाही, किंबहुना ते आणखी झपाटय़ाने पुढे गेले. गरीबांचा मसीहा म्हणून ओळख असणाऱया आणि वैश्विक स्तरावर शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून झटणाऱया या शांतिदूताचे अलीकडेच प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

गोल्ड कोस्ट म्हणजे आताच्या घाना या देशात एका सुखवस्तू, संपन्न कुटुंबात 8 एप्रिल 1938 राजी कोफी अन्नान यांचा जन्म झाला. त्यांचे वडील प्रांतीय गव्हर्नर होते. घानातीलच कुमासी येथे शालेय शिक्षण घेऊन 1961 मध्ये त्यांनी अमेरिकेच्या सेंट पॉल कॉलेजमध्ये अर्थशास्त्र्ााचे शिक्षण घेतले. जिनेव्हातून आंतरराष्ट्रीय व्यवहार विषयात पदवी घेतली. त्यानंतर 1962 मध्ये डब्ल्यूएचओ या संस्थेत बजेट अधिकारी म्हणून काम सुरू केले. 1965 ते 1972 या काळात त्यांनी इथियोपियाची राजधानी अद्दीस अबाबा येथे संयुक्त राष्ट्रांच्या ‘इकॉनॉमिक कमिशन फॉर आफ्रिका’ या संस्थेसाठी काम केले. न्यूयॉर्कमधील मुख्यालयात नियुक्त होण्याआधी याच संयुक्त राष्ट्र संघातच अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले. 1997 आणि 2006 मध्ये सलग दोन केळा त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिकपद भूषविले होते. या पदावर विराजमान होणारे आफ्रिकन वंशाचे ते पहिले नागरिक होते. संयुक्त राष्ट्रांच्या किकिध संघटनांमध्ये ताळमेळ राहाका म्हणून 1997 मध्ये कोफी यांनी संयुक्त राष्ट्र किकास समूहाची स्थापना केली होती.

जगभरात शांतता कशी प्रस्थापित होईल आणि गरिबी कशी संपवता येईल याचाच ध्यास कोफी अन्नान यांनी घेतलेला होता. त्यासाठी महासचिव असतानाच 2015 पर्यंत जगातील गरिबी कशी नष्ट करता येईल याचे उद्दिष्टच त्यांनी ठेवले होते. युद्धकाळात शांतता प्रस्थापित करण्यासोबतच युद्धात होरपळलेल्यांचे पुनर्वसन करण्याचे महत्कार्यही त्यांनी हाती घेतले. मागील काही वर्षांपासून सीरियातील शरणार्थी आणि रोहिंग्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते काम करत होते. सीरियाचे राष्ट्रपती बशर अल असद यांची त्यांनी अलीकडेच भेटही घेतली होती.

इराकमध्ये कुवैतवर 1990 मध्ये हल्ले झाले. त्यावेळी 900 हून अधिक बहुराष्ट्रीय कर्मचारी आणि बिगर इराकी लोकांना मायदेशी पोहोचवण्यात कोफी अन्नान यांनी मदत केली. माणुसकीच्या दृष्टिकोनातून तेल विक्री केली जाण्यासाठी इराकला राजी करण्यातही कोफी यांचा वाटा मोठा होता. इंडोनेशियातून फुटून 1999 मध्ये ईस्ट तिमोर हा वेगळा देश निर्माण करण्यातही कोफी अन्नान यांची महत्त्वाची भूमिका राहिली. एचआयव्ही, टीबी आणि मलेरियासारख्या साथरोगांचे उच्चाटन करण्यासाठी जागतिक निधी उभारण्याकामी कोफी यांचे मोठे योगदान राहिले. कोफी यांच्या कार्यकाळातच संयुक्त राष्ट्र संघाचे दहशतवादविरोधी धोरण आखले गेले. इंग्रजी, फ्रेंच आणि अनेक आफ्रिकी भाषांवर प्रभुत्व असलेले कोफी अन्नान हे ‘कोफी अन्नान फाऊंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष होते. तसेच नेल्सन मंडेला यांनी स्थापन केलेल्या ‘द एल्डर’ या आंतरराष्ट्रीय संघटनेचे अध्यक्षही होते. इराकविरुद्ध अमेरिकेने पुकारलेले 2003 मधील युद्ध रोखू शकलो नाही याची खंत कोफी यांना अखेरपर्यंत राहिली. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ती बोलूनही दाखवली. युद्धखोर अमेरिकेने सुरक्षा परिषदेची परवानगी न घेताच आपला मनसुबा साधला आणि त्याहीपेक्षा अमेरिकेचे त्यावेळचे राष्ट्रपती जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी संयुक्त राष्ट्र संघाचे आता फारसे महत्त्व राहिले नाही, असे वक्तव्य केले. या गोष्टींचे अतीव शल्य कोफी अन्नान यांना लागले होते.