ठसा : सोमनाथ चॅटर्जी

>>संदीप देशमुख<<

सोमनाथदा! सोमनाथदा! नावातच एक आत्मीय भावनेचा ओलावा. माकपचे नेते, खासदार म्हणून सलग दहा वेळा निवडून आलेले लोकप्रतिनिधी, उत्कृष्ट संसदपटूचा किताब मिळवणारे वक्ते, १४ व्या लोकसभेचे निर्विवाद, बिनविरोध निवडून आलेले अध्यक्ष अशी लौकिकार्थाने ओळख असलेले सोमनाथ चॅटर्जी. सोमनाथदा कडक शिस्तीचे भोक्ते तर होतेच, प्रसंगी स्वपक्षीयांनाही खडेबोल सुनावण्याचे धाष्टर्य़ बाळगणारे स्पष्टवक्तेही होते. देशासोबतच जगभराच्या प्रश्नांची जाण ठेवतानाच शोषित, वंचित, उपेक्षितांच्या हिताचे भान राखणारे ते सच्चे लोकसेवक होते. समाजहितासाठी आपले संपूर्ण कसब पणाला लावण्याची त्यांची तयारी असायची. त्यासाठी मग पक्षीय तटबंदी भेदण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. ही वेगळी ओळखच त्यांना सोमनाथदा हे आपुलकीजन्य संबोधन देऊन गेली.

तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी २२ जुलै २००८ रोजी सोमनाथदांनी ज्या करारीपणाने सभागृहाचे कामकाज चालवले, त्याची दखल देशच नव्हे तर जगभरात घेतली गेली. सर्व स्तरांतून त्यांची प्रशंसा केली गेली. अमोघ वक्तृत्वाचे धनी असलेल्या सोमनाथदांचा करारी बाणाही अशा प्रसंगी दिसून यायचा. सर्वोच्च संसदेचे पावित्र्य जपताना कोणाचाही मुलाहिजा ते बाळगत नसत. प्रणव मुखर्जी यांची राष्ट्रपतीपदी निवड व्हायची होती, तेव्हाच ‘हिंदुस्थानला अतिशय योग्य राष्ट्रपती मिळत आहे,’ अशा शब्दांत  प्रतिक्रिया देणाऱ्या सोमनाथदांच्या मनाचे मोठेपण दिसते ते अशा प्रसंगांतून. अणूकराराच्या मुद्दय़ावरून सोमनाथदांच्या माकपने तेव्हाच्या पंतप्रधान मनमोहनसिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला. सोमनाथदांनाही लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले. पण लोकसभा अध्यक्ष हा कोणत्याही एका पक्षाचा नसतो, असे बाणेदारपणे सांगत सोमनाथदांनी त्यास नकार दिला. माकपने त्यांना पक्षातून काढले. याचे शल्य सोमनाथदांना अखेरपर्यंत राहिले. वास्तविक डाव्या पक्षांतून झालेले लोकसभेचे ते एकमेव अध्यक्ष ठरले.

एकदा भाजपने सोमनाथदांवर पक्षपाताचा आरोप केला होता. त्या पत्रावर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचीही स्वाक्षरी होती. भाजपच्या आरोपापेक्षाही वाजपेयींनी स्वाक्षरी केल्याची टोचणी सोमनाथदांना जास्त लागली. त्यांनी थेट वाजपेयींकडेच याबाबत विचारणा केली. पक्षशिस्तीचा भाग म्हणून आपल्याला स्वाक्षरी करावी लागली, परंतु आपण भेदभाव करत नाहीत, असा खुलासा वाजपेयींनी केला, तेव्हा कुठे सोमनाथदांचे समाधान झाले होते. वाजपेयींवरील त्यांचे निरलस प्रेम तर सर्वश्रुतच होते. पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन व्यक्तिगत मैत्र जपण्याचे हे एक आगळे उदाहरण मानता येईल.

सोमनाथदांची कौटुंबिक पार्श्वभूमी तशी हिंदुत्वाच्या अंगाने जाणाऱ्या राष्ट्रीय विचारांची. एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या सोमनाथदांचे वडील प्रख्यात वकील आणि अ. भा. हिंदू महासभेच्या संस्थापकांपैकी एक होते. अशाही वातावरणात परदेशी शिक्षण घेऊन आलेल्या सोमनाथदांनी डाव्या विचारसरणीच्या पक्षातून राजकारणाला सुरुवात केली. एकेक टप्पे पार करत ते लोकसभेच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचले. मात्र, या राजकीय प्रवासात स्वतःच्या म्हणून जपलेल्या ध्येयवादाशी, मूल्यांशी ते प्रामाणिक राहिले. शोषित, वंचित घटकांच्या हिताचा, व्यापक लोककल्याणाचा विचार सोमनाथदांनी अखेरपर्यंत जपला. तसेही सोमनाथदांनी देहदानाचा संकल्प केला होता. यातून मरणोपरांतही देहरूपाने समाजाच्या उपयोगी पडण्याची त्यांच्या विचारांतील उदात्तताच दिसून येते.

वयाच्या नव्वदीच्या उंबरठय़ावर सोमनाथदांनी या जगाचा निरोप घेतला, पण समाजाच्या अंतर्मनात त्यांची म्हणून जी एक प्रतिमा त्यांनी निर्माण करून ठेवली, ती कायमच राहणार आहे. परस्पर हेवेदावे, कोणत्याही थराला जाऊन केले जाणारे राजकारण, नीतिमत्तेला तिलांजली देऊन केली जाणारी चिखलफेक अशा सगळय़ा व्यक्तिगत स्वार्थाने बरबटलेल्या राजकीय वातावरणातही उठून दिसणारी आणि दीपस्तंभासमान भासणारी जी काही व्यक्तिमत्त्वे उरली होती, त्यात सोमनाथदांचेही नाव घ्यावे लागते. आज त्यांच्या जाण्याने लोकभावनेची जडण जपतानाच समाजमनाची घडण करणारा एक लोकनेता हरपला आहे, हे मात्र खरेच.