मसालेदार… झटपट सॅण्डविच

3

मीना आंबेरकर

सॅण्डविच चटपटीत होण्यासाठी तयार मसाला घरी ठेवावा. म्हणजे आयत्यावेळी झटपट सॅण्डविच बनवता येतील

आजच्या तरुणाईला आवडणारा व लोकप्रिय असणारा पदार्थ म्हणजे सॅण्डविच. तयार करण्यास अतिशय सोपा, कुठेही घेऊन जाण्यास सोयिस्कर व भूक लागल्यावर चटकन कुठेही  खाता येईल, असा हा पदार्थ सर्वांनाच खूप आवडतो. प्रसंगी पोळी-भाजीला पर्याय म्हणून सहजगत्या आपल्या रोजच्या जेवणात अथवा नाश्त्यामध्ये आपले स्थान भक्कम करून आहे. हल्ली प्रत्येक घरात स्लाईस ब्रेड व लोणी हे दोन पदार्थ बहुतांशी असतातच. हे दोन पदार्थ हाताशी असल्यावर ‘भूक भूक’ करत येणाऱया घरच्या सदस्यांसाठी घरातील गृहिणी हा झटपट प्रकार त्यांच्यासमोर ठेवून ती त्यांची भूक शमवू शकते.  हे सॅण्डविच ती वेगवेगळय़ा प्रकारे बनवून ती आपले पाककौशल्य सिद्ध करू शकते बघूया. मग कसे बनतात हे सॅण्डविच ब्रेडमध्ये विविध भाज्या व बटर घालून केलेले सॅण्डविच मुलांना शाळेच्या डब्यात देता येतात. सॅण्डविच चटचपटीत होण्यासाठी हा तयार मसाला घरी ठेवावा म्हणजे आयत्यावेळी झटपट सॅण्डविच बनवता येतील.

sandwich-2

सॅण्डविच मसाला

साहित्य जिरे-मिरे १० ग्रॅम, बडीशेप २० ग्रॅम, आमचूर २० ग्रॅम, ब्याडगी मिरचीचे लाल तिखट २५ ग्रॅम. सैंधव चवीनुसार.

कृती सर्व पदार्थ भाजून बारीक करून एकत्र करून ठेवावे. सॅण्डविच बनवताना ब्रेडला बटर लावून त्यावर हा मसाला भुरभुरावा. त्यात आवडीची भाजी किंवा काकडी टोमॅटोच्या चकत्या ठेवाव्यात व बंद करून सॅण्डविच बेकरमध्ये भाजावे. हा झाला सॅण्डविच साधा सोपा प्रकार. आणखी काही प्रकार पाहूया…

चिकन सॅण्डविच

साहित्य -८ ताजे ब्रेड स्लाईस, १ मोठा चमचा बटर, पाव वाटी मेयॉनिज सॉस, २ मोठे चमचे क्रीम (किंवा मलई), १ छोटा चमचा सॅण्डविच मसाला, १ वाटी ताजे फडफडीत उकडलेले चिकनचे तुकडे, मीठ चवीनुसार.

कृती ब्रेडच्या स्लाईस टोस्ट करून त्याला अमूल बटर लावून घ्यावे. एका बाऊलमध्ये चिकनचे छोटे तुकडे, मेथॉनिज सॉस क्रीम, मीठ, सॅण्डविच मसाला एकत्र करून घ्यावे. एका ब्रेडच्या स्लाईसवर तयार मिश्रण दोन चमचे पसरवून त्यावर दुसरी स्लाईस ठेवावी. तयार सॅण्डविचचे दोन भाग करावेत, सर्व्ह करताना वरून थोडे चीज भुरभुरावे.

shwzwan-sandwich

शेजवान सॅण्डविच

साहित्य  १ वाटी पनीरचे बारीक तुकडे, १/४ वाटी मशरूम बारीक चिरून,  १/४ वाटी बेबी कॉर्न स्लाईस करून, २-३ टेस्पून सेजवन सॉस, १/४ वाटी कांदा पात, १ कांदा पातळ चिरून, ८-१० ब्रेडच्या स्लाईस, १टे-स्पून बटर.

कृती प्रथम गॅसवर पॅन गरम करून त्यात पनीर, मशरूस, बेबी कॉर्न व सेजवन सॉस एकत्र करून चांगले परतून घ्यावे. त्यातच कांद्याची पात घालून मिश्रण कोरडे करावे. ब्रेडच्या स्लाईससना बटर लावून त्या तव्यावर टोस्ट करून घ्याव्यात. नंतर त्यावर तयार केलेले मिश्रण पसरवून घ्यावे वर कांद्याची स्लाईस ठेवून वरून ब्रेडची टोस्ट केलेली दुसरी स्लाईस ठेवून गरमच सर्व्ह करावी.

cheese-sandwich-5

चीज चिली सॅण्डविच टोस्ट

साहित्य पाव वाटी किसलेले चीज, १ ढोबळी मिरची, सॅण्डविच मसाला. एक स्लाईड ब्रेड.

कृती ढोबळी मिरचीचे बारीक तुकडे करावेत. ब्रेडच्या स्लाईसेवर किसलेले चीज, थोडा सॅण्डविच मसाला घालून वर ढोबळी मिरचीचे तुकडे घालावेत. टोस्टरमध्ये सॅण्डविच खरपूस भाजून घ्यावेत. टोमॅटो सॉसबरोबर खायला द्यावेत.

चटणी सॅण्डविच

साहित्य  १ ताजा ब्रेड, ५० ग्रॅम, अमूल बटर, २ लाल टोमॅटो, २ छोटय़ा काकडय़ा, अर्धी वाटी, नारळ खवून. मूठभर कोथिंबीर, अर्ध्या लिंबाचा रस ४-५ हिरव्या मिरच्या. १५-२० पाने पुदिना, ५-६ लसूण पाकळय़ा, मीठ, साखर, सॅण्डविच मसाला चवीनुसार, खवलेला नारळ, कोथिंबीर, मिरच्या, लसूण पाकळय़ा, पुदिना, मीठ, लिंबाचा रस, साखर, सॅण्डविच मसाला घालून बारीक चटणी वाटून घ्यावी. टोमॅटो व काकडीच्या गोल पातळ चकत्या कराव्यात. सॅण्डविच ब्रेडच्या सर्व स्लाईसेसना एका बाजूने थोडे लोणी व १ चहाचा चमचा चटणी लावावी, ब्रेडच्या स्लाईसवर काकडीच्या फोडी व टोमॅटोच्या फोडी ठेवून त्या स्लाईसवर दुसरा स्लाईस ठेवावा. हाताने दाबावे. अशा तऱहेने सर्व स्लाईसचे सॅण्डविच करून घ्यावेत. आवडत असल्यास धारदार सुरीने कडा काढून प्रत्येक सॅण्डविच मधोमध तिरका कापावा.