सांगली लोकसभेची जागा ‘स्वाभिमानी’ला दिल्याची चर्चा, कार्यकर्त्यांनीच काँग्रेस कमिटीला ठोकले टाळे

सामना प्रतिनिधी, सांगली

सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिल्याची चर्चा सुरू होताच सांगलीतील काँग्रेस कार्यकर्ते संतप्त बनले. काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला आव्हान देणाऱया या भूमिकेचा निषेध करण्यासाठी त्यांनी घोषणाबाजी करत थेट जिल्हा काँग्रेस कमिटीलाच कुलूप लावले. ‘कुलूपबंद’ काँग्रेस कमिटीची चर्चा क्षणार्धात पसरताच अखेर हे कुलूप काढण्यात आले, मात्र त्यानंतर आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी थेट वसंतदादा घराण्यावर हल्ला करत गेली 35 वर्षे खासदारकी भोगणाऱ्यांनी या निवडणुकीतून पळ काढल्याचा आरोप केला तर काँग्रेसच्या ताब्यातून ही जागा जावी हे एक षड्यंत्र असून यामागे ‘झारीतील शुक्राचार्य’ असल्याचा आरोप विशाल पाटील यांनी केला.

काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखणाऱ्या सांगलीत आणि एकेकाळी संपूर्ण राज्याची उमेदवारी सांगलीच्या निर्णयावर होत होती अशी परिस्थिती असताना या वेळेच्या लोकसभा निवडणुकीवरून काँग्रेसअंतर्गत गटबाजीमुळे ही हक्काची जागा स्वाभिमानीकडे जाताना काँग्रेसचे कार्यकर्ते हवालदिल झाल्याचे आज दिसले.

…आणि पसरली अस्वस्थता
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे प्रतीक पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे इच्छुक होते, तर डॉ. विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्या नावांची चर्चा होती, मात्र डॉ. विश्वजीत कदम यांनी लोकसभेसाठी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे उमेदवारी कुणाला असा प्रश्न निर्माण होत असतानाच आज अचानक सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याचा निर्णय झाल्याचे वृत्त धडकले आणि काँग्रेसमध्ये अस्वस्थतेचे वातावरण पसरले.