संजय दत्तचा मुलगा शहरान करणार बॉलिवूड पदार्पण 

सामना ऑनलाईन । मुंबई 

अभिनेता संजय दत्त बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारी असताना त्याचा चार वर्षाचा मुलगा शहरान बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. शहरान लवकरच संजय दत्त प्रोडक्शनच्या ‘हसमुख पिघल गया’ या चित्रपटात एका छोट्याशा भूमिकेत दिसणार आहे. तो तीन वर्षाचा असताना या चित्रपटातील एका गाण्यासाठी त्याने शूटिंग केले होते.

या चित्रपटात राज कपूर यांच्यावरील ‘किसी की मुस्कराहटो’ पे हे गाणे घेण्यात आले आहे. हे गाणे चित्रपटाच्या सुरवातीला व अखेरीस दोन वेळा दाखविण्यात येणार आहे. सुरवातीचे गाणे चित्रपटाचा नायक अरमानवर तर अखेरचे गाणे अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. याच गाण्यात एका छोट्याशा भूमिकेत शहरान दिसणार आहे.

‘हसमुख पिघल गया’ हा चित्रपट मुंबईच्या उन्हाळ्यातील एका दिवसाची कथा आहे. रोमॅण्टिक कॉमेडी असलेल्या या चित्रपटात नवोदित कलाकार अरमान व नाजिया हुसैन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.