काँग्रेसचा जाहीरनामा देशद्रोही – संजय राऊत

3

सामना प्रतिनिधी, नाशिक

सत्ता असताना आणि आता विरोधी पक्षात असतानाही काँग्रेस पक्ष या देशाची अस्मिता आणि सुरक्षिततेशी खेळ करण्याचे काम करीत आहे. या निवडणुकीतील या पक्षाचा जाहीरनामा देशद्रोही आहे, असा घणाघात शिवसेना नेते, उत्तर महाराष्ट्र विभागीय नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजपा, रिपाइं, रासप, शिवसंग्राम महायुतीचे शिवसेना उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ नाशिकरोड भागातील जेलरोड येथील जाहीर सभेत संजय राऊत बोलत होते. लोकसभेची ही निवडणूक राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रद्रोह यांच्यामधील आहे. या देशात राष्ट्रप्रेम राहील की राष्ट्रद्रोह याचा निर्णय घेणारी ही निवडणूक आहे, असे त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले.

हिंदुस्थानचे रक्षण करणाऱया मर्द जवानांच्या पाठीशी आपण उभे राहिलो असताना याच शूरवीर सैनिकांच्या शौर्यावर शंका घेऊन संपूर्ण जगात या देशाला अपमानित करण्याचे काम करणाऱया काँग्रेस आघाडीचा पराभव केलाच पाहिजे, असेही ते म्हणाले. विरोधकांच्या 56 पक्षांच्या 56 पिढय़ा खाली उतरल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पराभव करणे शक्य होणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. काँग्रेस पक्षाचा जाहीरनामाच देशद्रोही असल्याचे सांगताना ते म्हणाले की, या पक्षाच्या जाहीरनाम्यातील दहा गोष्टी वाचल्या तरी देशद्रोह म्हणजे काय हे स्पष्ट होते.

दहशतवाद्यांच्या गळ्याभोवतीचा हा फासच काढून टाकण्याचे षड्यंत्र काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आहे. 370 वे कलम रद्द केले तर हिंदुस्थानात राहणार नाही, असे मेहबुबा मुफ्ती म्हणते, तर या देशात एक दिल्लीला आणि एक कश्मीरला असे दोन पंतप्रधान करण्याची भाषा फारुख अब्दुल्ला करतात. एखादा दहशतवादी पकडला तर त्याला उलटे टांगून धडा शिकविण्याचा अधिकार ज्या कायद्यामध्ये आहे, ज्या कायद्याने जवानांना विशेष अधिकार दिले असा ‘अफस्पा कायदा’ आम्ही रद्द करू असे काँग्रेस म्हणते. हा कायदा रद्द झालाच तर पकडलेल्या दहशतवाद्याला सन्मानाने हारतुरे आणि फुले द्यावी लागतील, बिर्याणी खाऊ घालावी लागेल, त्याच्यावर ओरडणं, रागावणं चालणार नाही. हा सैनिकांचा अपमानच असल्याचे सांगत अशा विरोधी आघाडीच्या लोकांच्या हातात देशाची सूत्रे जाता कामा नये, असेही ते म्हणाले.