लेख : आपण देशासाठी काय करतो?

>>संजय शिंदे<<

sanjayshinde35@gmail.com

ज्या देशासाठी मेजर कौस्तुभ राणे यांच्यासारखे अनेक जवान शहीद झाले त्या देशाच्या सुदृढ निर्माणासाठी मी काय करतो? या प्रश्नांचं उत्तर आपल्यातल्या प्रत्येकाने शोधायला हवं. ज्या देशासाठी आपल्या शहीद जवानांनी वयाच्या केवळ २९ व्या वर्षी बलिदान दिलं तो देश सामाजिक, भौतिक, वैचारिकदृष्टय़ा प्रगल्भ होण्यासाठी आपण काय करतो याचे आत्मपरीक्षण प्रत्यकाने करायला हवे.

पंधरा ऑगस्ट, २६ जानेवारी हे दिवस आले की अनेक सरकारी कार्यालयांमधले तिरंगी झेंडे बाहेर काढले जातात, फडकवले जातात. पुन्हा अंधार व्हायच्या आत कपाटात ठेवले जातात. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या दोन दिवशी झेंडावंदनाला उपस्थिती लावली, डी.पी.बदलले की आमचं देशाप्रति असलेलं कर्तव्य संपलं. एखाद्या शहीदाला श्रद्धांजली वाहिली की आमचं कर्तव्य संपलं. मग गप्पांमध्ये आम्ही म्हणतो, ‘किती महान आहेत आपले सैनिक! आपण नाही देशासाठी जीव देऊ शकत! तेच खरे देशभक्त!!’

शहीद झालेले सैनिक, सीमेवर खडा पहारा देणारे सैनिक या साऱ्यांची या देशावर अपार देशभक्ती आहेच. त्यांच्याविषयी आदर बाळगणं हे आपलं परमकर्तव्यच आहे. पण यापलीकडे जाऊन मला प्रश्न पडतो की, आपण देशासाठी काय करतो? देशभक्ती म्हणजे केवळ सीमेवर जाऊन लढणं नव्हे! देशभक्तीची व्याख्या फार व्यापक आहे. सीमेवर लढायला न जाता, शहीद न होताही एक नागरिक म्हणून आपण या देशासाठी खूप काही करू शकतो. आपला देश आहे त्या स्थितीपेक्षा एक पाऊल पुढे जावा म्हणून आपल्यासाठी खूप छोटय़ा, पण देशासाठी खूप मोठय़ा असणाऱ्या गोष्टी करू शकतो आपण!

हल्ली स्वतःच्या घरापासून, गल्लीपासून ते अगदी दिल्लीपर्यंत कोणतीही समस्या कानावर आली की आधी पंतप्रधान, मग मुख्यमंत्री, नेते, आमदार, खासदार, अधिकारी यांना शिव्यांची लाखोली वाहिली की आपण मोकळे. रस्त्यावर खड्डे पडलेत, मैदानात कचरा साचलाय, गटारात पाणी तुंबलंय, कचरा उचलून नेला नाही, ट्रफिक जाम झालंयं, प्रदूषणाचा त्रास होतोय, पेट्रोल महाग झालं, अमुक ठिकाणी आग लागली, तमुक ठिकाणी पुलावर चेंगरून माणसं मेली. एक ना अनेक! अशा अनेक समस्या समोर आल्या की आपलं एकच उत्तर ‘सरकार काही करत नाही.’

ठीक आहे! सरकार ढिम्म आहे. असू शकतं. पण सरकारला नाकाम ठरवताना आपण या समस्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न केले? समाजातले अनेक प्रश्न हे महानगरपालिका, राज्य-केंद्र सरकार, लोकप्रतिनिधी यांच्या अकार्यक्षमतेमुळे निर्माण झालेले आहेतच. पण समाजातले अनेक प्रश्न हे नागरिकांमुळेही निर्माण झाले आहेत हे सत्य आहे. यातल्या काही छोटय़ा-छोटय़ा प्रश्नांची समस्यांची फार छोटी-छोटी उत्तरे, उपाय नागरिक म्हणून आपण करू शकतो. नव्हे, ते करणं हे एक नागरिक म्हणून आपलं कर्तव्यच आहे. पण वास्तव हे आहे की आपण सगळय़ा समस्यांची जबाबदारी प्रशासनावर, काळावर किंवा अगदी नियती नावाच्या एखाद्या अदृश्य बाबीवर टाकून मोकळे होतो.

अगदी आपल्या घरापासून किंवा गल्लीपासून/सोसायटीपासून सुरुवात करा. आपल्या घरातला कचरा ओला-सुका असा वेगळा करून घेण्याची विनंती आपल्याला महानगरपालिकेने हजारवेळा केलेली असते. कचऱ्याच्या प्रश्नावर ज्वलंतपणे बोलणारे आपण हा छोटासा नियम मात्र पाळत नाही. कोणत्याही सोसायटीत/विभागात जा पायऱ्यांवर, भिंतीच्या कोपऱ्यावर अनेकांनी थुंकून घाण केलेली असते. हे अनेकजण म्हणजे आपल्यातलेच कुणीतरी असतात.

रस्त्यावर गाडी चालवताना, सामूहिक ठिकाणी फिरताना, खरेदी करताना तर नियम मोडणाऱ्या माणसांची जणू स्पर्धाच लागलेली असते. हेल्मेट घालणे, सीटबेल्ट लावणे, वाहतुकीला अडथळा होईल अशा ठिकाणी पार्किंग न करणे, गाडी चालवताना विनाकारण हॉर्न न वाजवणे, गाडीचा वेग मर्यादेपेक्षा अधिक न ठेवणे, सिग्नल पाळणे हे सगळे नियम प्रचंड लोकसंख्या व गर्दी असणाऱ्या समूहात सर्वांनाच सुरक्षिततेने राहता यावे म्हणून आपणच आपल्यासाठी केलेले नियम आहेत. ते पाळण्यापेक्षा मोडण्याचीच स्पर्धा आपल्याकडे मोठय़ा प्रमाणात दिसते. आपण स्वतः अनेक नियम तोडायचे व नंतर समूहामध्ये बसून समाजात कसली ती शिस्तच राहिली नाही हो! अशा व्यर्थ चिंता वाहायच्या. हिंदुस्थानातले ६० टक्के अपघात हे केवळ नागरिकांनी सिग्नल न पाळल्याच्या चुकीमुळे होतात असं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

आज जागतिक पातळीवर हिंदुस्थानकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन काय आहे? स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटून गेली तरी आपण अजून ‘विकसित राष्ट्र’ म्हणून उभे राहू शकलेलो नाही. समाज बदलावा, देश सुधारावा, पुढे जावा अशी भावना आपल्या सर्वांच्या मनामध्ये असं ही खूप चांगली व सकारात्मक बाब आहे. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या दिवशी देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचं, शहीदांचं सीमेवर लढणाऱ्या जवानांचं स्मरण करणं आवश्यकच आहे. पण हे सगळं करत असताना माझ्या मनात माझ्या हिंदुस्थान देशाच्या प्रगतीबद्दल माझी जी स्वप्नं आहेत त्या स्वप्नपूर्तीसाठी एक नागरिक म्हणून मी काय करतो? हिंदुस्थानच्या प्रगतीसाठी चांगल्या समाजासाठी मी काय योगदान देतो? शासनावर, प्रशासनावर तोंडसुख घेताना मी स्वतः समाजातल्या एखाद्या सकारात्मक बदलासाठी किती प्रयत्न करतो? हे प्रश्न एक नागरिक म्हणून स्वतःला विचारणं फारच गरजेचं आहे.

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचं मोठं स्मारक मीरा रोड येथे बांधण्याची घोषणा नुकतीच महापौरांनी केली आहे. ज्या देशासाठी मेजर कौस्तुभ राणे यांच्यासारखे अनेक जवान शहीद झाले त्या देशाच्या सुदृढ निर्माणासाठी मी काय करतो? या प्रश्नांचं उत्तर आपल्यातल्या प्रत्येकाने शोधायला हवं. ज्या देशासाठी आपल्या शहीद जवानांनी वयाच्या केवळ २९ व्या वर्षी बलिदान दिलं तो देश सामाजिक, भौतिक, वैचारिकदृष्टय़ा प्रगल्भ होण्यासाठी आपण झटणं व या देशाकडे कुणाचीच वक्रदृष्टी होणार नाही इतकं या देशाला समृद्ध करणं हीच या शहीद जवानांना आपण वाहिलेली खरी श्रद्धांजली असेल.