वाण

<< डॉ. गणेश चंदनशिवे >>

संक्रांतीच्या निमित्ताने स्त्रिया एकमेकींना वाण देतात… काय प्रघात असेल यामागे?

मकर संक्रातीचा सण म्हटलं तर उत्साहवर्धक वातावरण पहावयास आपणास मिळते. हा सण संपूर्ण हिंदुस्थान खंडात मोठय़ा उत्साहात आणि आनंदात केला जातो. पुरुष पतंग उडवून आनंद व्यक्त करतात, तर महिला तिळगूळ देऊन सुवासिनींना वाण देण्याचे काम करतात. सौभाग्याचे लेणे हळद-कुंकू असून कुटुंबप्रमुख पतिपरमेश्वर याला दीर्घायुष्य लाभो आणि त्याला सुदृढ, निरोगी स्वास्थ्य मिळो म्हणून महिलावर्ग हळद-कुंकू देऊन एक दुसऱयांना शुभेच्छा देतात. वाण देणे ही परंपरा कधी सुरू झाली हे सांगणे तसे कठीण आहे तरीसुध्दा महाभारतातला एक दृष्टांत वाण देण्यासंबंधी आपल्यासमोर आहे.

वाण देणे म्हणजे नेमके काय? हे जर बघायचे असेल तर सुगीच्या दिवसात येणारी पिके, तीळ, गूळ, पेरू, जाम, बोर, उसाची कांडे, मातीचे गाडगे, त्यातील सुगडा, डाळ तांदळाची खिचडी, हुरडा इ. धान्य घेऊन सुवासिनी ताटावरती नवे कोरे वस्त्र झाकून वाण देण्याची प्रथा आहे. याच्या पाठीमागचं शास्त्र हेच आहे की, धनधान्य या काळात दान करावे म्हणून ते झाकून द्यावे. जेणेकरून धान्यरूपी वैभवावर कोणाचीही दृष्ट पडू नये. दान करताना आपल्या घरात शेतीतून उदयाला आलेलं धान्य यात बरकत यावी व संसार समृध्द व्हावा म्हणून हा सण साजरा केला जातो. भारतीय परंपरेत नुसतं धान्य दान करून चालत नाही. तर उगवलेली पिकेही खाण्यातही आली पाहिजे. ज्या ज्या हंगामामध्ये जी पिके, फळं उदयाला येतात ती ती पिके शरीराला पौष्टिकता देऊन जातात. म्हणूनच बोर, पेरू, ऊस खाल्याने शरीरातील रक्तात आयर्न टिकून रहाते. पाचनक्रिया चांगली राहते. तांदूळ, मुगाची डाळ, हुरडय़ाची खिचडी शरीराला जीवनसत्त्व देऊन जाते.

पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना ती सूर्यमालेतूनसुध्दा भ्रमण करत असते. तेव्हा सूर्याचा परिवर्तित होणारा वेग मंदावतो. पौष महिन्यात कोवळे भासणारे ऊन आणखीनच गुलाबी थंडीचा प्रत्यय आणून देते. मकर संक्रातीच्या काळातील थंडी ही शरीराला ऊर्जा निर्माण करून देते. या काळात येणारी धान्य, फळे माणसाच्या शरीरात लोह आणि स्निग्ध निर्माण करतात. म्हणून मकर संक्रातीच्या सणानिमित्ताने गुळातील गोडवा आणि तिळातील स्निग्धता हे प्रेम आणि स्नेहभाव वाढवते.

मकर संक्रातीच्या काळामध्ये मानवी स्वभावाच्या दोन्ही वृत्ती आपणास पहावयास मिळतात. या वृत्ती दिशेतून सिद्ध होतात. एक उत्तर दिशा आणि दुसरी दक्षिण दिशा या दोन्हीही दिशा परस्परविरोधी आहेत. सूर्य परिवर्तन होताना या दोन्ही दिशांच्या प्रवृत्तीचा आपणास अनुभव येतो. या संक्रमण काळात संक्रातीच्या वेळी उत्तर दिशा ही संत विचारांचे ज्ञान दर्शविते, तर दक्षिण हा प्रकाशाचा कट्टर वैरी आहे अशी अनुभूती येते. म्हणूनच शनीचे सूर्यावर जेव्हा आक्रमण होते तेव्हा नवीन प्रकाशाचा जन्म होतो. तो काळ म्हणजेच मकर संक्रातीचा होय.
आपसातील वैरत्व नष्ट व्हावे म्हणून समाज एकसंध आहे. त्याने एकोप्याने नांदावे, तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला असे आपण म्हणतो.

मकर संक्रातीचा हाही एक उद्देश आहे तो असा की पूर्वी महिला खुलेआम बाहेर पडत नसत. त्यांच्या फिरण्याला आणि जगण्याला मर्यादा येत असत. अशा सणानिमित्त वाण देण्याच्या बहाण्याने एक दुसऱयांची नवी ओळख आणि स्नेहभाव निर्माण होऊ लागला. एक दुसऱ्याबरोबर ते आपले सुख-दुःख वाटू लागले. वाणरूपी स्नेह एक दुसऱयांमध्ये आत्मियता निर्माण करू लागला. म्हणूनच ‘मकर संक्रातीचा सण’ हा भारतीय परंपरेत नवीन आशेचा किरण घेऊन येतो. प्राचिन काळापासून ही परंपरा भारतीय संस्कृतीत आजतागायत सुरू आहे.