ओळख लपवून संदेश पाठवण्यासाठी उपयुक्त अॅप

सामना ऑनलाईन । दुबई

इंटरनेच्या युगात कोणती गोष्ट कधी आणि कशी व्हायरल होईल याचा अंदाज बांधणे कठीण आहे. सध्या प्ले स्टोअरवर साराहाह (Sarahah) नावाचे अॅप प्रचंड लोकप्रिय झाले आहे. या अॅपच्या मदतीने कोणतीही व्यक्ती स्वतःची ओळख लपवून कोणालाही संदेश पाठवू शकते. हे अॅप आतापर्यंत लाखो लोकांनी डाऊनलोड केले आहे. गुगल प्ले स्टोअरवरील सर्व अॅपच्या क्रमवारीत चौथ्या आणि फ्री अॅपच्या क्रमवारीत अव्वल स्थानी हे अॅप पोहोचले आहे. अॅपलच्या अॅप स्टोअरवरही याच अॅपची धूम आहे.

जेमतेम ५ एमबी फाइल साईझचे हे छोटेखानी अॅप सौदी अरेबियातील जैनुल आबेदीन याने विकसित केले आहे. त्याने अॅपला साराहाह हे अरबी नाव दिले आहे. या अरबी नावाचा अर्थ प्रामाणिकपणा असा आहे. एखादी व्यक्ती स्वतःची ओळख लपवूनच दुसऱ्याविषयीचे खरे मत त्याला सांगू शकते. यातून प्रत्येक व्यक्ती आपल्यात सुधारणा करुन अधिकाधिक चांगली होण्याचा प्रयत्न करू शकते असा एक चांगला विचार करुन हे अॅप तयार करण्यात आले आहे. अॅपची नोंदणी अमेरिकेतील डेन्वर कोलॅरॅडोमधील एका कंपनीमार्फत झाली आहे.

गुन्ह्यांचा धोका

साराहाह अॅपमुळे गुन्हे वाढण्याचा धोका सायबर तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. सध्या जगातील ३० देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर साराहाह अॅप डाऊनलोड झाले आहे. अॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यावर नोंदणी करुन ते वापरता येते, मात्र संदेश पाठवताना स्वतःची ओळख लपवता येते. त्यामुळे एखादी व्यक्ती धमकावण्यासाठी साराहाह अॅपचा वापर करू शकते. सध्या सोशल नेटवर्कवर साराहाह अॅपविषयी मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती साराहाह अॅपचा गुन्ह्यांसाठी वापर करण्याची शक्यता वाढली असल्याचे सायबर तज्ज्ञ सांगत आहेत.