हॉकीचा ‘सरदार’ झाला निवृत्त

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंह (32) याने बुधवारी आंतरराष्ट्रीय स्तरावरून निवृत्तीची घोषणा केली. गेल्या 12 वर्षापासून हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सरदार सिंह याने तरुणांवर आता जबाबदारी उचलण्याची वेळ आली आहे, असे म्हणत निवृत्ती जाहीर केली.

आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये झालेल्या निराशाजनक कामगिरीनंतर सरदार सिंहने निवृत्तीचा निर्णय घेतला. आशियाई क्रीडा स्पर्धेत गतविजेत्या हिंदुस्थानला फायनलही गाठता आली नव्हती. उपांत्यफेरीत मलेशियाकडून पराभव सहन करावा लागल्याने हिंदुस्थानला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. हॉकी संघाच्या या कामगिरीवर सर्वच स्तरातून टिका करण्यात आली होती. तसेच सरदार सिंहचे वय वाढत असून पहिल्यासारखा चपळपणा त्याच्यात राहिला नसल्याने हिंदुस्थानला पराभव सहन करावा लागला असेही टिकाकारांनी म्हटले होते. याचमुळे सरदारने हॉकीला रामराम करण्याचा निर्णय घेतला.

निवृत्तीची घोषणा करताना सदरार म्हणाला की, ‘हो, मी आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी कारकीर्दीत खूप जास्त हॉकी खेळलो. 12 वर्ष खूप मोठा पल्ला असतो. आता तरुण पिढीने जबाबदारी सांभाळण्याची वेळ आली आहे.’ तसेच मी चंदीगढमधील माझे कुटुंब, हॉकी इंडिया आणि मित्रांसोबत चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. आता हॉकीनंतर काय याचा विचार करण्याची वेळी आली आहे, असेही तो म्हणाला. विशेष म्हणजे आशियाई क्रिडा स्पर्धेदरम्यान सरदार सिंहने माझ्यात अजून बरीच हॉकी बाकी असून 2020 मध्ये टोकियोत होणारा ऑलिम्पिक खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु अचानक निवृत्तीच घोषणा करून त्याने सर्वांनाच धक्का दिला आहे.

जबरदस्त कामगिरी
सरदार सिंहने 2006मध्ये पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले होते. मिडफिल्डमध्ये जगातिल सर्वात ताकदवर खेळाडू म्हणून पुढे त्याला ओळखले जाऊ लागले. सरदार सिंहने हिंदुस्थानकडून 350 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 2008 ते 2016 दरम्यान सलग आठ वर्ष सरदारने हॉकी संघाचे कर्णधारपद भूषवले. 2008मध्ये सुलनतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत संघाची धुरा सांभाळणारा सरदार सर्वात युवा खेळाडू आहे. 2012मध्ये सरदारला अर्जुन पुरस्कार आणि 2015मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्याचा सन्मान करण्यात आला. सरदारने दोन ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले.