ठेवणीतल्या साडय़ांना नवा साज चढवूया

सामना प्रतिनिधी । मुंबई

अनेक भारी साडय़ा कपाटात असतात. या ठेवणीतल्या साडय़ांना जरा नवा साज चढवूया…

कांजीवरम, बनारसी, महेश्वरी, इंदुरी, पटोला अशा विविध प्रकारच्या साडय़ा सणासुदीला, विशिष्ट समारंभाला आवडीने विकत घेतल्या जातात, मात्र त्याच त्याच साडय़ा पुनः पुन्हा नेसाव्याशा वाटत नाहीत. तरीही या साडय़ा जुन्या झालेल्या नसतात. मग या साडय़ांचं काय करायचं हा प्रश्न पडतो.

साडी हा आपला हिंदुस्थानी आणि कोणत्याही समारंभात उठून दिसणारा मुख्य पोषाख. त्यामुळे विकत घेताना चांगल्या क्वॉलिटीची नवीन डिझाईनची साडीच खरेदी केली जाते. तसेच लग्नकार्य, समारंभाच्या निमित्ताने कौतुक म्हणून भेटही दिली जाते. हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे साडी फारशी नेसलीही जात नाही. याकरिता आपल्या या खास ठेवणीतल्या साडय़ा नवीन पद्धतीनेही आपण उपयोगात आणता येतात. जुन्या रेशमी, जरीच्या साडय़ांना लाँग स्कर्ट, दुपट्टा, कुर्ती, अनारकली, जॅकेट असं नवं रूप देता येईल. सध्या सुरू असलेल्या सण-उत्सवात अशा पद्धतीने नवनवीन पॅटर्नचे ड्रेसेस वापरल्यास साडय़ांमुळे तुमचं सौंदर्य नक्कीच उठून दिसेल.

ब्लॅक मॅजिक

काळ्या रंगाच्या साडय़ा नेसून कंटाळा आला की अशा साडय़ांचा काठ कुर्ती, नी लेंग्थ ड्रेसेस किंवा गाऊन्स असे पॅटर्न आवडीप्रमाणे शिवू शकता. काळ्या साडय़ांचे ड्रेसेस सगळ्यांनाच आवडतात असे नाही, पण काठांचा उपयोग करून ड्रेसचं हटके डिझाईन होऊ शकतं.

कॅज्युअल लाँग ड्रेसेस

कॅज्युअल प्रसंगासाठी सिल्कची साडी असण्याची आवश्यकता नाही. छानशी, सुंदर बॉर्डर असलेली कॉटन साडी, तलम महेश्वरी किंवा ब्लॉक प्रिंटची साडीही खुलून दिसू शकते. हैदराबादच्या मंगलिरी कॉटन किंवा खणाच्या कापडाचे ड्रेसेसही सुंदर दिसतात.

जॅकेटस्

बाजारात हल्ली नवनवीन डिझाईन्सची जॅकेट बघायला मिळतात. ड्रेसवर जॅकेट घातल्याने ड्रेसचंही सौंदर्य उठून दिसतं. यासाठी प्लेन ज्यूट किंवा खादी सिल्कच्या साडीच्या कपडय़ाला वेगळी लेस लावून जॅकेट शिवता येईल. यासाठी कलमकारी, इकत, जॅकेटच्या प्रकाराची निवड होऊ शकेल.

कफ्तान 

बारीक काठाच्या साडीचे कफ्तान सौंदर्यात भर घालते. तुमच्याकडील बारीक काठांच्या साडय़ा नेसून कंटाळा आल्यास किंवा या साडय़ांचे आता काय करायचे असा प्रश्न पडला असेल तर अशा साडय़ांचे कफ्तान शिवू शकता.

फन विथ बॉर्डर

काठपदर असलेल्या, बनारसी किंवा सिल्क साडय़ांचं काय करायचं, असा प्रश्न पडतो, कारण या साडय़ा तलम असतात. या साडय़ांचं वैशिष्टय़ म्हणजे त्यांचे काठही वर्षानुवर्षे टिकतात. या बॉर्डर्सचा कलात्मक वापर करून ड्रेसेस किंवा इव्हिनिंग गाऊन्स बनवता येतील. तलम साडय़ांचे छानसे काठ कमरेजवळ, घेरालाही वापरू शकता किंवा दोन साडय़ांचं लेअरिंग करून कॉण्ट्रास्ट गाऊनही शिवू शकता.

पल्लू ड्रेसेस

हा नी-लेंग्थ ड्रेसचा वैशिष्टय़पूर्ण प्रकार आहे. यामध्ये समोरून वन शोल्डर ड्रेस दिसतो पण मागून साडीचा पदर सोडलेला असं मस्त कॉम्बिनेशन असतं. यासाठी रेशमीच साडी हवी असं नाही. कोणतीही मऊसूत साडी जी सहसा फुगत नाही ती या प्रकारासाठी उत्तम. यामध्ये घेरदार ड्रेस किंवा स्ट्रेट फिट असे दोन्ही पर्याय सुंदर दिसतात.

शॉर्ट ड्रेसेस

शॉर्ट ड्रेसेससाठी सिल्क साडय़ाच हव्यात. त्या ठरावीक काठपदराऐवजी रुंद काठपदराच्या घ्याव्यात. साडय़ांच्या काठांचा योक किंवा घेरासाठी उपयोग करून सेमीफॉर्मल ड्रेस तयार होईल. योकसाठी  कलमकारी किंवा खणाचं कापड वापरलं तर साडीचा ड्रेस आहे असं कुणाच्याही लक्षात येणार नाही.