lok sabha 2019 – सुरतच्या साड्यांची चलती

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । सूरत

निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. प्रचाराची रणनीती आखली जात आहे. मतदारांना जिव्हाळय़ाच्या वाटतील अशा दैनंदिन जीवनशैलीच्या वस्तूंना प्रचाराचे माध्यम बनवले जात आहे. यामध्ये साड्यांनी बाजी मारली आहे. नेत्यांची छबी असलेल्या साड्यांची मागणी वाढली आहे. आशियातील सर्वात मोठी कापड बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरत येथील बाजारात निवडणूक तेजी दिसत आहे. सुरतच्या व्यापाऱ्यांना 10 ते 20 हजार साड्यांची ऑर्डर मिळत आहे.

देशभरातील विविध शहरांतून सुरतच्या व्यापाऱ्यांकडे साड्यांची ऑर्डर नोंदवली जात आहे. एका वेळी 20 हजारांएवढ्या साड्या मागवल्या जात आहेत. कार्यकर्त्यांना, मतदारांना देण्यासाठी या साड्या आहेत. डिजिटल प्रिंट प्रकारातील साड्यांची मागणी जास्त आहे. सर्वात जास्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छबीवाल्या प्रिंट साडय़ा, त्याखालोखाल योगी आदित्यनाथ यांच्या छबीवाल्या प्रिंट साड्यांची ऑर्डर व्यापाऱयांना मिळत आहे.

स्वस्त आणि मस्त
स्वस्त साड्यांना सर्वात जास्त मागणी आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि ईशान्य राज्यांतून 150 ते 175 रुपये किमतीच्या साड्यांची ऑर्डर येत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सर्जिकल स्ट्राइकनंतर 10 ते 15 हजार साड्यांची ऑर्डर मिळत होती. आता ती लाखाच्या घरात गेली आहे.