साताऱ्यातील राजकारण ढवळून निघणार, आमदारांनी घेतली पवारांची भेट

1

सामना प्रतिनिधी । सातारा

सातारा जिल्ह्याच्या आगामी राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार हे सोमवारी स्पष्ट झाले. साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख आमदारांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीत पुढील राजकीय रणनीतीविषयी चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीनंतर सर्वच आमदारांनी मीडियाच्या प्रतिनिधींसमोर थेट भाष्य करणे टाळत गोविंदबागेतून निघून जाणे पसंत केले.

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले, विक्रमसिंह पाटणकर, बाळासाहेब पाटील हे या बैठकीस उपस्थित होते. बैठकीचे स्वरुप विचारात घेता आगामी राजकीय आडाखे काय आखायचे याचीच चर्चा झाली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास सर्वच आमदार गोविंदबाग येथे उपस्थित झाले. ही सभा गोपनीय असल्याने कोणालाच या बाबत काहीच माहिती देण्यात आली नव्हती.

पक्षाचे खासदार उदयनराजे यांनी साताऱ्यात शरद पवार यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर फसवाफसवी करु नका, नाहीतर आम्हालाही कळतं, असे त्यांनी विधान केले होते, त्या पार्श्वभूमीवर सोमवारी बारामतीत सातारा जिल्ह्यातील प्रमुख आमदारांची झालेली बैठक राजकीय दृष्टया अत्यंत महत्वाची मानली जात आहे.