थेट आकाशातून असा दिसतो कुंभमेळा, इस्रोने फोटो केले प्रसिद्ध

3

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदूंचा सर्वात मोठा तीर्थमेळा व युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादीत समावेश झालेल्या कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. प्रयागराजच्या पवित्र संगमावर ‘हर हर गंगे’ असा घोष करीत लाखो लोकं पवित्र डुबकी लगावत आहेत. कुंभमेळ्यामध्ये समाविष्ट होण्यासाठी लाखो लोकं जमले असून अनेक मार्गस्थ आहेत. याच कुंभमेळ्याचा थेट आकाशातून फोटो काढण्यात आला असून इस्रोने हा फोटो प्रसिद्ध केला आहे.

युनेस्कोच्या वारसा यादीत कुंभमेळा

हिंदुस्थानचा रिमोट सेन्सिंग उपग्रह ‘कार्टोसॅट-2’ने कुंभमेळ्याचे फोटो काढले आहेत. या फोटोमध्ये कुंभमेळा आणि आसपासचा मुख्य भाग दिसत आहे. पवित्र नदीमध्ये स्नान करणारे भाविकही दिसत आहे. तसेच नवीन यमना पूल आणि त्रिवेनी संगमही (गंगा, यमुना आणि गुप्त रूपाने वाहणाऱ्या सरस्वती नदीचा संगम) यात दिसत आहे.

कुंभ महापर्वाला मंगळवारी पहाटे मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर प्रयागराजच्या पवित्र संगमावर 13 आखाडय़ांच्या शाही स्नानाने प्रारंभ झाला. गंगा, यमुना आणि गुप्त रूपाने वाहणाऱ्या सरस्वती या तीन नद्यांच्या पवित्र संगमावर 1.4 कोटी भाविकांनी स्नान केले. ‘हर हर गंगे’ असा घोष करीत भाविकांनी गंगा नदीत स्नान केले.