बाहुबलीसाठी कटप्पाने पुन्हा टेकले गुडघे, मागितली माफी

सामना ऑनलाईन । बंगळुरू
आपण ज्याला मारायला निघालो आहोत तो अमरेंद्र बाहुबलीचा मुलगा महेंद्र बाहुबली असल्याचं लक्षात येताच कटप्पाच्या हातातून भाला गळून पडतो… कटप्पा गुडघे टेकून महेंद्र बाहुबलीच्या पायांपर्यंत घसरत जातो आणि खाली मान घालून त्याची  माफी मागतो… बाहुबली-१मधील माफी मागतानाचं हे दृश्य जबरदस्त हिट ठरलं… पण कटप्पाचा माफीनाम्याचा सिलसिला इथेच संपत नाही. कट्टपाची भूमिका वठवणारा सत्यराजला बाहुबलीसाठी पुन्हा एकदा माफी मागावी लागली आहे.

बाहुबली-२ येत्या २८ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. देशभरात बाहुबली-२ साठी उत्सुकता असताना कर्नाटकात विशेषतः बंगळुरूमध्ये बाहुबली-२च्या प्रदर्शनाला विरोध केला जात होता. तामीळनाडू आणि कर्नाटकच्या पाणीप्रश्नावर कन्नडविरोधी भूमिका घेतल्याने कटप्पाच्या भूमिकेतल्या सत्यराज यांच्याविरोधात हा बंद पुकारला गेला होता. मात्र, सत्यराज यांनी एका व्हिडिओद्वारे कन्नडिगांची माफी मागितली आहे.

तामीळनाडू आणि कर्नाटकमध्ये कावेरी नदीच्या पाण्यावरून गेली अनेक वर्षं वाद सुरू आहे. या मुद्द्याला धरून ९ वर्षांपूर्वी सत्यराज याने कन्नडविरोधी भूमिका घेत एक विधान केलं होतं. यामुळे कानडी जनता त्याच्याविरोधात संतापली आहे. त्यामुळेच त्याच्या या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी कन्नडिगांनी केली होती. पण, बाहुबलीच्या प्रदर्शनावर याचा परिणाम होत असल्याचं दिसल्यानंतर कटप्पा उर्फ सत्यराजने झालं गेलं विसरून जा म्हणत पुन्हा एकदा बाहुबलीसाठी माफी मागितली आहे.

या माफीनाम्यामुळे कर्नाटकात बाहुबलीच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहुबलीचा मारेकरी कटप्पाला माहिष्मती जनता माफ करते का? हे आता कर्नाटकातील सिनेरसिकांना पाहाता येणार आहे.