मृतदेहाचा रेल्वे प्रवास


सतीश कोड

ऐन संकटाच्या वेळी देवासारख्या तत्परतेने धावून येणाऱ्या तीन संस्था म्हणजे पोलीस, ऍम्ब्युलन्स आणि अग्निशमन! या तिन्ही सेवा पुण्यकार्य, सत्कार्य आणि सामाजिक बांधिलकी अहोरात्र जपणाऱ्या सेवा. यांच्यापैकीच पोलीस सेवेचा नुकताच आलेला हा अनुभवही झलकरेल्वे पोलिसांचे कर्तृत्व!

टाडा न्यायालयाचे ८२ वर्षीय सेवानिवृत्त न्यायाधीश  जयसिंगराव गायकवाड वरळी येथे राहतात. त्यांचा आणि माझा खास परिचय असल्याने त्यांच्या मध्यस्थीतून वर्सोव्याला राहणाऱ्या इरफान शेख यांनी माझ्याशी संपर्क साधून फोनवर मला विचारले, ‘आपली रेल्वेमध्ये काही ओळख आहे का?’

मी विचारले, ‘सर, काय काम आहे?’ शेख म्हणाले, ‘माझ्या ९३ वर्षीय आजीचा मृतदेह रेल्वेने अलाहाबाद येथे न्यायचा आहे. आम्ही सर्व कुटुंबीय मृतदेहासह सीएसएमटी स्थानकाकडे येत आहोत, पण तिथे कोणाला भेटायचे, काय करायचे याची मला काहीही कल्पना नाही.’ शेख यांच्या बोलण्याने क्षणभर मीसुद्धा भांबावून गेलो, पण प्रसंगाचे गांभीर्य ओळखून मी त्यांना धीर दिला.

उच्चपदस्थ पोलीस अधिकारी डी. कनकरत्नम रेल्वे पोलीसमध्ये कार्यरत असल्याचे माहीत असल्याने फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना हकिकत सांगितली. ते म्हणाले, ‘मी सध्या रेल्वेमध्ये नाही, पण तरीही सीएसएमटी रेल्वे पोलीस स्टेशनला कोण अधिकारी आहे हे बघून तुम्हाला फोन करतो.’ दरम्यान, शेख आणि त्यांचे नातेवाईक सीएसएमटी स्थानकावर पोहोचले. कनकरत्नम यांच्याशी झालेला संवाद मी शेख यांना सांगून डी. कनकरत्नम हे विशेष पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी असल्याचीही माहिती दिली.

कनकरत्नम यांनी मला फोनवर सांगितले की, ‘लोकल ट्रेन आणि मेल ट्रेन यांच्या मधल्या पॅसेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थातच सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे असून तिथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले कार्यरत आहेत. त्यांना मी सविस्तर सांगितलेले आहे. तुम्ही संबंधितांना चौगुले यांना भेटायला सांगा. ते सर्व व्यवस्था पार पाडतील.’’ कनकरत्नम यांचे आभार मानून मी त्यांच्या पाठोपाठ इरफान शेख यांच्याशी संपर्क साधून त्यांना सगळं समजावून सांगितले. विलास चौगुले यांचा संपर्क क्रमांकही दिला.

संध्याकाळी सहाच्या सुमारास शेख यांनी माझ्याशी संपर्क साधून सीएसएमटी स्थानकाच्या पोलीस पथकाने अथक परिश्रम घेऊन शवपेटी तयार करून रेल्वे प्रवासाचे सर्व सोपस्कार पूर्ण केल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये जाऊन प्रत्यक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांचे आभार मानले. सविस्तर माहिती देताना त्यांनी सांगितले की, त्या लोकांनी मृतदेह त्यांच्या मुस्लिम धर्मानुसार ज्या पद्धतीने आणला होता त्या शवपेटीतून रेल्वेमधून अलाहाबादपर्यंत नेण्यासारखा नव्हता. म्हणून आम्हाला वेगळय़ा शवपेटीची व्यवस्था करावी लागली. सीएसएमटी ते अलाहाबाद हा २४ तासांचा प्रवास असल्यामुळे विशेष व्यवस्थाही करावी लागली. या सगळय़ा सोपस्काराला सात हजार रुपये खर्च झाला. ऍम्ब्युलन्स अथवा अन्य वाहनाने हा मृतदेह अलाहाबादला नेला असता तर किमान ४० हजार रुपयांपर्यंत खर्च आला असत़ा  सर्वसामान्य जनतेसाठी पोलीस यंत्रणा सदैव तत्पर असते याचे हे ज्वलंत उदाहरण.