गरीबांना मोफत विजेचे ‘सौभाग्य’, डिसेंबर २०१८ पर्यंत देशात सर्व घरांत वीज

सामना प्रतिनिधी, नवी दिल्ली

गरीबांना मोफत वीज कनेक्शन (जोडणी) देणारी प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना (सौभाग्य) सुरु करण्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तसेच डिसेंबर २०१७ पर्यंत देशात सर्व घरांत वीज पुरवठा केला जाणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सौभाग्य योजने’चा शुभारंभ केला आहे.

भ्रष्टाचार खपवून घेणार नाही; माझा कोणीही नातेवाईक नाही
भ्रष्टाचारावर कुठलीही तडजोड करणार नाही. भ्रष्टाचारात जो कोणी सापडेल त्याला सोडणार नाही. माझा कोणाशीही संबंध नाही आणि माझे कोणीही नातेवाईक नाहीत, असे पंतप्रधान मोदी यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत सांगितले. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाची माहिती पत्रकारांना दिली. राजकीय पक्ष म्हणून निवडणुका लढविणे एक प्रक्रिया आहे. पण भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकांच्या पलीकडे गेले पाहिजे. लोकांचा सहभाग वाढवला पाहिजे असे त्यांनी सांगितले.

देशातील २५ कोटी कुटुंबांपैकी ४ कोटी कुटुंबांच्या घरात वीज पुरवठा झालेला नाही. सौभाग्य योजनेअंतर्गत २०११ च्या जनगणनेनुसार जे कुटुंब सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्य़ा मागास आहेत अशा घरांमध्ये मोफत वीज जोडणी देणार. शहरी आणि ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना लाभ होणार.

  • योजनेसाठी १६३२० कोटींची तरतूद
  • ज्यांची नावे जनगणनेत नाहीत अशांना ५०० रुपयांत वीज जोडणी.
  • दुर्गम भागातील कुटुंबांना वीजेसाठी २०० ते ३०० वॅटची सौरउर्जा बॅटरी.
  • देशात सर्व घरांमध्ये २४ तास वीज देण्याचे पूर्वीचे टार्गेट मार्च २०१९ होते. या योजनेमुळे डिसेंबर २०१८ पर्यंत वीज देण्याचे सरकारचे नवे टार्गेट.
  • बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, ओडिशा, झारखंड, जम्मु-काश्मिर, राजस्थान, तसेच ईशान्य भागातील सर्व राज्यांमध्ये प्राधान्याने ‘सौभाग्य’ योजना राबविली जाणार आहे.