सौदीचे आकाश एअर इंडियाला मोकळे

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

सौदी अरेबियामार्गे एअर इंडियाच्या हिंदुस्थान-इस्रायल उड्डाणाला सौदी अरेबियाने हिरवा कंदील दिला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी वॉशिंग्टन येथे दिलेल्या माहितीत हिंदुस्थान-इस्रायल ही विमान सेवा आता सौदी अरेबियामार्गे होणार असल्याचे स्पष्ट केले.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना भेटल्यानंतर इस्रायली पत्रकारांनी नेतान्याहू यांच्याशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांना माहिती नेतान्याहू यांनी ही माहिती दिली, पण आतापर्यंत सौदी अरेबियाकडून याविषयीचा खुलासा करण्यात आलेला नाही. सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यातील संबंध चांगले नाहीत, परंतु हे दोन्ही देश अमेरिकेच्या अगदी जवळ आहेत. शिवाय इराणला हे दोन्ही देश त्यांचा प्रखर विरोधी समजतात. गेल्या महिन्यातच एअर इंडियाने तेल आयातीसाठी इस्रायलहून सौदी अरेबियामार्गे हिंदुस्थानात येणाऱ्या तीन विमान उड्डाणांची घोषणा केली होती.

सध्या इस्रायल एअरलाइन्सची चार साप्ताहिक उड्डाणे मुंबईहून तेल आयातीसाठी निघतात. ही उड्डाणे सात तासांत इस्रायलला पोहोचतात. ही विमाने हिंदुस्थानच्या पूर्वेकडून इथिओपिया जातात व तिथून इस्रायलला उतरतात. सौदी अरेबियामार्गे उड्डाणाला बंदी असल्याने हा उलटा प्रवास करावा लागतो. जर सौदी अरेबियाने हिंदुस्थान-इस्रायल विमान सेवेला परवानगी दिल्यास हा प्रवास अवघ्या दोन तासांत पूर्ण होणार आहे.