कट्टर मुस्लीम राष्ट्र सौदीमध्ये योगाला खेळाचा दर्जा

सामना ऑनलाईन । दुबई

हिंदुस्थानमध्ये योगावर धार्मिक राजकारण सुरू आहे. योग शिकवणाऱ्या मुस्लीम तरुणीला फतवा काढून मारण्याची धमकी दिली जात असतानाच आखाती देशांपैकी एक असणाऱ्या सौदी अरब या मुसलमान राष्ट्रामध्ये योगाला खेळाचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. सौदी अरबच्या व्यापार आणि उद्योग मंत्रालयाने योगाला खेळाचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. योग शिकवण्याआधी तुम्हाला लायसन्स घेणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे सौदीमध्ये योग शिकवणे आणि शिकणे आता आधापेक्षा सोपं झाले आहे.

सौदी अरबमध्ये योगाला खेळाचा दर्जा मिळण्याचे श्रेय नउफ मरवई यांनी देण्यात येत आहे. नउफ मरवई या सौदीमधील पहिल्या महिला योग शिक्षक आहेत. नउफ यांनी जेद्दामध्ये रियाद-चायनिज मेडिकल सेंटर उघडले आहे. या ठिकाणी आयुर्वेदिक आणि योगसारख्या पारंपारिक प्रकारे रुग्णावर उपचार केले जातात. नउफ यांच्या मते योगाचा धर्माशी कोणताही संबंध नाही.

गेल्या काही दिवसांपासून कट्टर मुस्लीम समजल्या जाणाऱ्या सौदी अरबमध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत. सौदीचा राजा शाह सलमान बिन अब्दुल अजीज यांचा मुलगा आणि प्रिन्स मोहम्मद बिन सलमान याने सौदीला ‘उदारवादी मुस्लीम’ देश बनवण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी सौदीमध्ये महिलांना कार चालवण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र या बदलांना तेथील धर्मागुरूंकडे प्रखर विरोध होताना दिसत आहे. आता तर सौदीमध्ये योगाला खेळाचा दर्जा देण्यात आल्याने मुस्लीम धर्मगुरूंची काय प्रतिक्रिया असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.