चीनच्या पावलावर साऊदीचे पाऊल, जैशचा म्होरक्या मसूदला पाठिंबा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जम्मू-कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हिंदुस्थानचे 42 जवान शहीद झाले. या हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याचे समोर आले. या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याचा संयुक्त राष्ट्राच्या जागतिक दहशतवादीच्या यादीत समावेश करण्यास चीनने विरोध केला होता. आता साऊदी अरब चीनच्याच पावलावर पाऊल टाकताना दिसत आहे.

हिंदुस्थानच्या जखमेवर चीनने मीठ चोळले, जैशचा म्होरक्या मसूदला पाठिंबा

साऊदी अरब आणि पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राच्या ब्लॅकलिस्ट केल्या जाणाऱ्या प्रक्रियेला ‘राजकारण’ असल्याचे म्हणत जोरदार विरोध केला. दोन्ही देशांनी हा सूर आळवल्याने जैशचा म्होरक्या मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या हिंदुस्थानच्या आशांना सुरुंग लावण्याचे चीननंतर साऊदीचे प्रयत्न असल्याचे उघड होत आहे.

साऊदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी पाकिस्तानचा दौरा केला. यानंतर ते हिंदुस्थानच्या दौऱ्यावर (19-20 फेब्रुवारी) येणार आहेत. यापूर्वी प्रिन्स मोहम्मद यांनी शांतता राखण्यासाठी चर्चा हाच पर्याय असल्याचे म्हटले.