अमेरिकेच्या धमकीचा परिणाम; सौदी अरब हिंदुस्थानला अतिरिक्त तेल देणार


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याबाबत अमेरिकेने सौदी अरेबियाला गेल्या आठवड्यात धमकीवजा इशारा दिला होता. त्यामुळे जगातील सर्वात जास्त तेल निर्यात करणाऱ्या सौदीने नोव्हेंबर महिन्यात हिंदुस्थानला चाळीस लाख बॅरेल अतिरिक्त तेल देण्याचे मान्य केले आहे. अमेरिकेने इराणवर घातलेल्या निर्बंधांची 4 नोव्हेंबरपासून अमंलबजावणी होणार आहे. त्यामुळे जगाला तेलाची कमतरता भासून नये आणि तेलाच्या किंमती वाढू नये, यासाठी अमेरिकेने ओपेक आणि सौदीला तेल उत्पादन वाढवण्याचा इशारा दिला होता. सौदीनेही तेलाची कमतरता भासू देणार नाही असे आश्वासन अमेरिकेला दिले आहे. दरम्यान, जागतिक घडामोडी पाहता तेलाच्या किंमती प्रतिबॅरल 100 डॉलरपर्यंत जाऊ शकतात असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

हिंदुस्थान इराणकडून तेल खरेदी करणारा दुसरा मोठा देश आहे. अमेरिकेच्या निर्बंधामुळे इराणकडून तेल आयात न करण्याचा निर्णय काही रिफायनरींनी घेतला आहे. त्यामुळे या कंपन्यांनी सौदीकडून नोव्हेंबरमध्ये अतिरिक्त 10 लाख बॅरेल तेल मागवले आहे. हिंदुस्थानची तेलाची गरज ओळखून इराणकडून तेल खरेदी करण्याची परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. इराणकडून 90 लाख बॅरेल तेल खरेदी करण्याची मागणीही हिंदुस्थानकडून करण्यात आली आहे.

हिंदुस्थान जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयात करणारा देश आहे. तेलाच्या वाढत्या किंमती, रुपयाची होणारी घसरण आणि तेलाची किंमत डॉलरमध्ये द्यावी लागत असल्याने हिंदुस्थानला तेल खरेदी महागात पडत आहे. सौदीने हिंदुस्थानला अतिरिक्त तेल देण्याचे मान्य केल्याने अडचणी कमी झाल्या आहेत. हिंदुस्थान सौदीकडून प्रत्येक महिन्याला सुमारे 2.5 कोटी बॅरेल तेल आयात करते.